व्यायाम साहित्य मोडकळीस
पिंपरी ः दापोडी येथील तथागत गौतम बुद्ध उद्यानात बसवलेले व्यायामाचे साहित्य मोडकळीस आले आहे. संबंधित ठेकेदाराने हे साहित्य बसविताना चांगल्या प्रकाराचे सिमेंट क्राँक्रिटीकरण केले नसल्यामुळे हे साहित्य हालत आहे. व्यायाम करताना हे मशिन जमिनीपासून हालत असल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने लवकरात लवकर हे साहित्य पूर्णपणे चांगल्या प्रकारे बसवून द्यावे.
- अकील शेख, दापोडी
फोटो आयडी - 81296
-----------
पदपथाच्या कामाने रस्ते अरुंद
निगडी प्राधिकरण पेठ क्र. २७ ते नियोजित महापौर निवास मैदान या मधल्या अंतर्गत रस्त्यावर स्मार्ट सिटी/नागरी विकासाच्या नावाखाली पदपथाचे काम करण्यात येत आहे. पदपथ किती आणि रस्ता किती असावा ? याचे काही नियम आहेत की नाही ? आधीच अंतर्गत छोटा रस्ता, त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पदपथ बनविले जाणार आहेत. त्यांची काय गरज आहे ? पालिकेकडे पैसे आहेत म्हणून कुठल्याही प्रकल्पावर खर्च करायचे पालिकेने ठरवलेले आहे का ? अतिशय निरुपयोगी प्रकल्प आहे हा. चारचाकी वाहन पार्किंगच्या जागा काटकोनात ठेवण्यात येत आहेत. मोटारी उचलून तिथे उभ्या करणार का ? आतापर्यंत ज्या काही रस्त्यांवर असे स्मार्ट पदपथ झालेत. बहुतेक ठिकाणी वाहतूक कोंडीत भरच पडली आहे. नागरिकांच्या समस्या सोडून वाहतूक आणि पार्किंगची समस्या निर्माण करण्याचे काम हा प्रकल्प करत आहे.
- भूषण नलावडे, प्राधिकरण
फोटो आयडी - 81298
----------
मदर तेरेसा पुलाखाली अतिक्रमण
आम्ही स्वतःची जागा संत मदर तेरेसा पुलासाठी महापालिकेला दिली. पूल झाला. पण, पुलाखाली आता पदपथावर अतिक्रमण करुन टपऱ्या टाकल्या आहेत. तसेच मिरवणूक झाल्यावर रथ तसाच वर्षभर रस्त्यात असतो. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असतो. तरी संबंधित अतिक्रमण महापालिकेने काढावे.
- विलास भोईर, लिंक रोड, चिंचवड
फोटो आयडी - 81299
----------