पिंपरी-चिंचवड

माय फ्रेंड श्रीगणेशा तीन

CD

माय फ्रेंड श्रीगणेशा तीन ः पीतांबर लोहार
--
गजानन

विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
कीर्तनकार महाराजांनी नामस्मरण केले. त्यांच्या मागोमाग टाळकरी व गायकांनीही टाळांचा ताल धरत ‘विठ्ठलऽऽऽऽ, विठ्ठलऽऽऽ, विठ्ठलऽऽ, विठ्ठलऽ...’ भजनाची दोन आवर्तने म्हटली. कीर्तनकार महाराजांनी दोन्ही हात समांतर उंचावत थांबण्याचा इशारा केला. तसे, टाळ आणि मृदंगाचा नाद थांबला. भजनही थांबले आणि महाराज बोलू लागले, ‘‘माय बाप श्रोतेजनहो ! आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. श्रीगणेश चतुर्थी. घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत. पुढील दहा दिवस उत्सव चालणार आहे. त्यानिमित्ताने या आळंदीनगरीमध्ये आयोजित कीर्तन महोत्सवात पहिल्या दिवसांची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली, हे मी माझे भाग्य समजतो. त्यासाठी गणरायाचेच वर्णन करणारा जगद्‍गुरू संत तुकोबारायांचा पाच चरणांचा अभंग निरुपणासाठी घेतलेला आहे.
धरोनियां फरश करीऽऽऽ। भक्तजनाचीं विघ्नें वारीऽऽऽऽ।। ऐसा गजानन महाराजा। त्याचें चरणीं हालो लागो माझा।।...
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ.... होऽऽऽऽ
भक्तजनहो! गणरायाला नमन करताना आपण सर्वजण,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः।
विर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
अशी प्रार्थना करतो. म्हणजेच आपण गणरायाचे नामस्मरण करतो. का नामस्मरण करतो? कारण, कोणत्याही देवतेची आपल्यावर कृपा व्हावी, त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभावा, त्यासाठी आपण नामस्मरण करतो. त्या देवतेची उपासना करतो. आता उपासना करणे म्हणजे काय? तर त्या देवतेच्या दर्शनासाठी मंदिरात जाणे. म्हणजे उपासना का? त्या देवतेला हार, फुले, नारळ, प्रसाद अर्पण करणे म्हणजे उपासना का? की एखादी स्तोत्र म्हणणे, प्रदक्षिणा घालणे म्हणजे उपासना का? तर इतकेच नाही. हे सर्व आपण करतोच. पण, त्या देवतेचे गुणत्व आपल्यात उतरावेत. आपल्या दैनंदिन दिनचर्येशी त्या देवतेची सांगड घालणे म्हणजे उपासना. आता उपासना शब्दाचा शब्दशः अर्थ बघितला तर त्याची फोड करावी लागेल. ती फोड म्हणजे ‘उप’ आणि ‘आसन’. ‘उप’ म्हणजे ‘जवळ’ आणि ‘आसन’ म्हणजे ‘बसणे’. म्हणजेच जवळबसून देवतेच्या अनुसंधानात राहणे, त्या देवतेच्या भक्तीत राहणे म्हणजे उपासना.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
आपण सर्वचजण श्रीगणेशाची, श्रीगणपतीची, लाडक्या गणरायाची, श्रीगजाननाची उपासना करतो. करतो की नाही? शिवाय, गणपती ही बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते. त्याला ‘सुखकर्ता, दुःखहर्ता’ असेही म्हटले जाते. वेगवेगळ्या नावांनी गणपतीला ओळखले जाते. जसे की, श्रीगणेश, गणपती, गजानन, एकदंत, वक्रतुंड वगैरे वगैरे... अशा एकशेआठ नावांनी गणपतीला ओळखले जाते. गणपतीच्या रुपानुसारही वेगवेगळी नावे आहेत. शिवाय, शंकराच्या गणांचा अधिपती म्हणून गणपती, ही जशी ओळख आहे, तशी गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे तोंड म्हणजेच ज्याचे तोंड हत्ती म्हणजेच गजासारखे आहे, त्याला ‘गजानन’ असे म्हटले जाते.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
अशा या गजाननाची पूजा आज आपण बांधणार आहोत. त्याची उपासना करणार आहोत.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
श्रीगजाननच्या पूजनात भाव, भक्ती, श्रद्धा आणि निष्ठेला खूप महत्त्व आहे. त्याला जास्वंदीचे पूल आणि दुर्वांची जुडीही खूप प्रिय आहे. तसे मोदकही गणपतीच्या आवडीचे आहेत. तसाच श्रीगणेशाचा वा श्रीगजाननाचा सिद्ध गायत्री मंत्रही सर्वपरिचित आहे.
ॐ गं गणपतये नमः।
एकदंताय विद्‍महे।
वक्रतुंडाय धीमहि।
तन्नो दंती प्रचोदयात।।
आहे की नाही, गणपतीला अग्रपूजेचा मानही आहे. म्हणजे कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी आपण गणपतीची आराधना करतो. गणपतीचे पूजन करतो. पण, का? असा प्रश्‍न मनात येतो. बरोबर की नाही. जेव्हा कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी गणपतीची पूजा सर्वप्रथम का करतो? असा प्रश्‍न जेव्हा मनात येतो, तेव्हा आठवते पौराणिक कथा. कोणती कथा? ती सर्वांना माहिती आहे. तरीही विषय निघाला म्हणून सांगतो, त्याशिवाय आपले कीर्तन पुढे सरकणार नाही. पौराणिक कथेनुसार, एकदा सर्व देवदेवतांमध्ये
अग्रपूजेचा मान आपल्यालाच मिळावा, यावरून वाद झाला. त्यामध्ये श्रीगणेश आणि त्याचा भाऊ कार्तिकेयही होते. कोणीही ऐकण्यास तयार नव्हते किंवा माघार घ्यायला तयार नव्हते. यावर तोडगा काढण्यासाठी सर्वजण भगवान शंकरजींकडे गेले. शंकरजींनी सर्वांचे ऐकून घेतले आणि निर्णय दिला की, सर्व देवतांमध्ये जो कुणी सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून परत येईल, त्याला आपण कोणत्याही कार्यात प्रथम पूजेचा मान देऊ. याला सर्वजण तयार झाले. पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सर्व देवता आपापले वाहन घेऊन निघाले. त्यात श्रीगजाननाचाही समावेश होता. पण, त्यांचे वाहन होते इवलासा मूषक. मूषक म्हणजे?....भावकांनी विचारत कीर्तनकार महाराज म्हणाले, ‘उंदीर’. आता उंदराच्या पावलाने चालून गणपतीला पृथ्वी प्रदक्षिणा करायला किती वेळ लागला असता. कारण, अन्य देवतांकडे वेगवेगळी वाहने होती. त्यांचा वेग मूषकापेक्षा अधिक होता. त्यामुळे आपण हरणार, हा विचार करून गणपतीने चाणाक्षपणे बुद्धीचा वापर केला आणि आपल्या आई-वडिलांना म्हणजे शंकर-पार्वतीला प्रदक्षिणा पूर्ण करून इतरांची वाट पहात थांबला. अथावकाश सर्व देवता पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून परत आले. आता शंकरजी काय निर्णय देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शंकरजी म्हणाले, ‘धर्मशास्रानुसार मातृ-पितृ भक्तीला अधिक महत्त्व आहे. त्यांना प्रदक्षिणा घालणे म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासमान आहे. गजाननाने बुद्धीचा वापर करून माता-पित्याला प्रदक्षिणा घालून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे तुम्हीच सांगा, कोणत्याही कार्यात अग्रपूजेचा मान कोणाला द्यायला पाहिजे?’ सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि श्रीगजाननाचे नाव सुचविले. तेव्हापासून आपला लाडका गणपती बाप्पा, श्रीगजानन, श्रीगणेश अग्रपूजेचा खरा मानकरी ठरला. आजही आणि यापुढेही गणपतीला अग्रपूजेचा मान मिळेल, यात शंका नाही. त्यासाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे लक्षात ठेवा आणि जीवनात मार्गक्रमण करत रहा!
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
म्हणूनच कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींनीही ‘श्रीभावार्थदीपिका’ ग्रंथामध्ये म्हणजेच ‘श्रीज्ञानेश्‍वरी’मध्ये सर्वप्रथम श्रीगणरायाला, श्रीगजाननाला वंदन केले आहे.
ँॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा।।
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ.... कीर्तनकार महाराजांना टाळकऱ्यांनीही विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ.... म्हणत साथ दिली. महाराजांच्या कीर्तनसेवेला प्रारंभ झाला होता....!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT