माय फ्रेंड श्रीगणेशा पाच ः पीतांबर लोहार
--
ॐ कार
विठ्ठलाचे नामस्मरण केल्यानंतर कीर्तनकार महाराज म्हणाले, ‘गणरायाचे वर्णन करताना माउली म्हणतात...,
पदबंध नागर। तेंचि रंगाथिलें अंबर। जेथ साहित्य वाणे सपूर। उजाळाचें।।’
म्हणजे सुसंस्कृत पद्यरचना हे गणरायाचे वस्त्र आहेत. त्यामुळे गणरायाचे रूप आणखी खुलून दिसते. गणपतीच्या पायात घुंगरूही आहेत आणि ती साधेसुधे घुंगरू नसून, महाकाव्ये आणि नाटकांच्या स्वरुपातील आहेत.
माउली पुढे म्हणतात,
देखा काव्यनाटका ।
जें निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका ।
अर्थध्वनि ॥
असे ही महाकाव्ये आणि नाटकांच्या रूपातील घुंगरू गणरायाच्या पायात आहेत. त्या घुंगरांवर सुंदर, देखणी अशी कलाकुसर केलेली रत्ने बसवली आहेत. त्याबाबत माउलींनी सुंदर असे वर्णन केले आहे. ते म्हणजे,
नाना प्रमेयांची परी।
निपुणपणे पाहतां कुसरी ।
दिसती उचित पदें माझारीं ।
रत्नें भलीं ॥... अशी ही रत्ने गणपतीला अधिक खुलून दिसतात. या गणपतीचे सौंदर्य किती आहे, याबाबत माउली पुढे,
तेथ व्यासादिकांचिया मती ।
तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती।
पल्लवसडका ॥...
अशा शब्दांत वर्णन करतात. म्हणजे महर्षी व्यासमुनींचे महाभारत असो वा महर्षी वाल्मीकींचे रामायण हे गणपतीच्या अंगावरील प्रतिभावान शेला आहेत, असे माउली म्हणतात.
गणपतीच्या आयुधांचे म्हणजे शस्त्रांचे वर्णनही माउलींनी केले आहे. गणपतीच्या हातामध्ये ही आयुधे आहेत. गणपतीला जर तुम्ही बघितले तर, किती हात दिसतात. दोन?, चार?, सहा?, आठ? किती? कीर्तनकार श्रोत्यांना प्रश्न विचारत स्वतःच सांगत होते की, काही ठिकाणी गणपतीला दोन हात दाखवलेले असतात. काही ठिकाणी चार हात दाखवलेले असतात. काही ठिकाणी सहा तर काही ठिकाणी आठ हात दाखवलेले असतात. माउलींनी मात्र सहा हात असलेल्या गणपतीचे वर्णन केलेले आहे. त्यासाठी माउलींनी ओवी रचली आहे,
देखा षड्दर्शनें म्हणिपती।
तेचि भुजांची आकृती।
म्हणऊनि विसंवादें धरिती।
आयुधें हातीं।।...
माउलींच्या मते, गणपतीला सहा भूजा असून, त्यामध्ये विविध आयुधे म्हणजे शस्त्र धारण केलेली आहेत.
तरी तर्क तोचि फरशु। नीतिभेदु अंकुशु।
वेदान्तु तो महारसु। मोदकु मिरवे।।
एके हातीं दंतु। जो स्वभावता खंडित।
तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा।।
मग सहजें सत्कारवादु। तो पद्मकरु वरदु।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु। अभयहस्तु।।
देखा विवेकवंतु सुविमळु। तोचि शुंडादंडु सरळु।
जेथ परमानंद केवळु। महासुखाचा।।
तरी संवादु तोचि दशनु। जो समताशुभ्रवर्णु।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु। विघ्नराजु।।
मज अवगमलिया दोनी। मीमांसा श्रवणस्थानीं।
बोधमदामृत मुनी। अली सेविती॥
प्रमेयप्रवाल सुप्रभ। द्वैताद्वैत तेचि निकुंभ।
सरिसे एकवटत इभ। मस्तकावरी।।
उपरि दशोपनिषदें। जियें उदारें ज्ञानमकरंदें।
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें। शोभती भलीं॥
अकार चरणयुगुल। उकार उदर विशाल।
मकार महामंडल। मस्तकाकारें।।
हे तिन्ही एकवटले। तेथें शब्दब्रह्म कवळलें।
तें मियां गुरुकृपा नमिलें। आदिबीज॥...
गणपतीचे वर्णन करणाऱ्या उर्वरित ओव्यांचा घड्याळाकडे पाहात धावता आढावा घेत कीर्तनकार महाराज म्हणाले, ‘माउली म्हणतात,
अकार, उकार, मकार यांचा मिलाफ जिथे होतो तिथे ‘ॐकार’ स्वरूप गणपती असतो.
ओमकार प्रधान, रूप गणेशाचे।
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।
गायकाने कीर्तनातील निरुपणाला अनुसरून अभंग गायला सुरुवात केली. त्यांना अन्य टाळकऱ्यांनी साथ केली. अभंग पूर्ण करण्यासाठी साधकाने पुढील चरणे म्हटली, त्यातून गणेशाचे रुप अधोरेखित झाले. ती चरणे म्हणजे,
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू।
मकार महेश जाणियेला ।।
ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न।
तो हा गजानन मायबाप ।।
गायक आणि टाळकऱ्यांनी अभंग पूर्ण म्हटल्यानंतर कीर्तनकार महाराज म्हणाले, ‘गणराया अथवा गजानन, लाडका गणपती हा ॐकार स्वरूप आहे, असे माउली त्याचे वर्णन करतात. त्याच गणपतीची प्रतिष्ठापना आपण आज केली आहे. त्यासाठीच आपण आज जमलो आहोत. त्याचीच आराधना करत आहोत, आराधना करणार आहोत.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.