पिंपरी, ता. १८ ः महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये विशेष मोहीम राबवून अनधिकृत होर्डिंग (जाहिरात फलक) तातडीने हटवावेत, असा आदेश आयुक्त तथा प्रशासन अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या किंवा वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फलकांवरही तत्काळ कारवाई करावी, तसेच परवानाधारक होर्डिंगची माहिती अद्ययावत ठेवून महसूल विभागाशी समन्वय वाढवावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीनिमित्त शहरातील तयारीचा आढावा श्रावण हर्डीकर यांनी घेतला. त्यानंतर निवडणूक तयारीच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापालिका निवडणुकीच्या तयारीसंदर्भात प्रशासनाच्या सर्व शाखांकडून सादर झालेल्या अहवाल चर्चा झाली. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व विभागांनी समन्वय राखत प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत, असा आदेश दिला. महापालिकेच्या मूलभूत सुविधा आणि सेवांवर अधिक भर देऊन कार्यक्षमता वाढवण्याचे आदेशही आयुक्त हर्डीकर यांनी दिले.
श्रावण हर्डीकर यांचा अधिकाऱ्यांना आदेश
- मतदान केंद्रांची स्थळनिश्चिती करावी
- निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी
- मतदान केंद्रांवर पुरवल्या जाणाऱ्या सुविधांची व्यवस्था करावी
- दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी सोयीसुविधा देण्याची कार्यवाही करावी
- मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे
- ईव्हीएमची सुरक्षितता पाहणे
- मतदार यादी अद्ययावत करणे
- प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती कराव्यात
- प्रारूप मतदार यादीतील बदलांची नोंद घ्यावी
- मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जनजागृती करावी
- मतदान व त्यासंबंधीत तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करावी
----