पिंपरी, ता. १९ : आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत दिघीतील चोविसावाडी आळंदीतील काटे वस्ती ते दिघीतील दत्तनगरपर्यंतचा भाग येतो. या दरम्यान महापालिकेने बीआरटी मार्ग, मुख्य मार्ग, सेवा रस्ता आणि पदपथ उभारला आहे. या मार्गातील एलईडी दिवे बदलण्यासह विविध विकास कामे व खर्चास स्थायी समिती सभेने बुधवारी मान्यता दिली.
महापालिकेतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर होते. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप आदी उपस्थित होते.
आवडी व गायत्री महिला बचत गट यांचे सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचे स्वच्छता व देखभाल दुरुस्ती कामास मुदतवाढ देणे, चऱ्होलीतील पठारे मळा ते पीर दर्गा परिसरातील डीपी रस्त्यावर विद्युत विषयक कामे करणे, महापालिका निवडणुकीसाठी संगणक प्रणाली खरेदी करणे, प्रभाग ११ मधील मथुरा स्वीट ते स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉलपर्यंत पावसाळी वाहिनी टाकणे, मुख्य अग्निशमन केंद्र संत तुकारामनगर व नवीन तालेरा रुग्णालय चिंचवड येथे आवश्यक यंत्र खरेदी करणे, नवी दिशा योजनेअंतर्गत सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छता व देखभाल कामकाज थेट पद्धतीने दिलेल्या कामास मुदतवाढ देणे, नेहरूनगर स्मशानभूमीमधील विद्युत दाहिनीचे १८ महिन्यांसाठी चालन व देखभाल दुरुस्ती करणे, चिंचवड व कासारवाडी परिसरातील रस्त्यांची कामे करणे आदी विषयांना मान्यता दिली.
अन्य महत्त्वाच्या विषयांना मान्यता
- पाणीपुरवठा विभागांतर्गत विविध पंप हाऊस देखभाल दुरुस्ती व पंप नव्याने बसविण्यासाठी तरतूद करणे
- महापालिका अर्थसंकल्पातील विविध विकासकामांसाठी तरतूद करणे
- ईडब्युएस हाउसिंग, जेयुएनयूआरएम व पीएमएवाय अंतर्गत कामांसाठी तरतूद करणे
- स्वच्छ भारत अभियानअंतर्गत कामांचा अर्थसंकल्पात समावेश करणे
---