चिखली, ता. १९ : चिखली-आकुर्डी रस्त्यावरील साने चौक येथे रस्त्याच्या मध्यभागी असलेले चेंबर वारंवार तुटत आहे. त्यामध्ये वाहने अडकून अपघात होत आहेत.
साने चौक येथील रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबर आठ दिवसांपूर्वी तुटले होते. त्यामध्ये वाहनांचे टायर अडकून अनेक अपघात झाल्यानंतर महापालिकेला जाग आली आणि चेंबर दुरुस्त करण्यात आले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चेंबरवरून वाहन गेल्यानंतर ते निघाले. गेल्या पाच दिवसांपासून निघालेली चेंबर तसेच पडून असून पालिकेला अद्यापही ते दुरुस्त करण्यासाठी जाग आलेली नाही. त्यामुळे सनी चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध असलेल्या या चेंबरमुळे अपघाताबरोबरच वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे चेंबर लवकरात लवकर दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
महापालिकेने चेंबर दुरुस्त केले, तरीही त्याचे झाकण वारंवार निघत आहेत. त्यामुळे डांबराचा वापर करून चेंबर व्यवस्थित बसवावे.
- सतीश साळुंखे, स्थानिक व्यापारी
रस्त्याच्या मध्यभागी तुटलेल्या चेंबरमध्ये अडकून अपघात होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे लवकरात लवकर महापालिकेने दखल घेऊन चेंबरची दुरुस्ती करावी.
- रुक्साना रेणावीकर, सामाजिक कार्यकर्त्या
69091