पिंपरी, ता. २२ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) प्रतिनियुक्तीवर येण्यास अधिकारी तयार नसल्याचे चित्र आहे. इतर शासकीय विभाग, महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात येणार होते. त्याबाबत ६३ जागांसाठी सर्व विभागांतून अर्ज सुद्धा मागविण्यात आले होते. आतापर्यंत विविध शासकीय विभागांकडून ५० अर्ज आले असून त्यातील केवळ २४ जणांनी प्रतिसाद दिला आहे. मुख्य अभियंता ते लिपिक अशा वेगवेगळ्या १५ पदांसाठी ६३ जागांची भरती करण्यात येणार आहे. सध्या असलेल्या विभागात मिळणारी बढती, कायमस्वरूपी कामाचा समावेश आदीबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे मूळ विभागातून पुन्हा ‘पीएमआरडीए’मध्ये सेवेसाठी येण्यास अधिकारी तयार नाहीत. प्रतिनियुक्तीच्या दोन वर्षांच्या सेवेचे मुल्यमापन केले जाणार आहे. त्यानुसार संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांना पुढील सेवेत कायमस्वरूपी केले जाणार आहे. या कारणामुळेही कर्मचारी फेरविचार करीत आहेत. त्यातच या पदाच्या भरतीबाबत नगरविकास विभागाची अंतिम मंजुरी येणेही बाकी आहे.
-----