पिंपरी : वर्धापनदिन लेख
--
साहित्य चळवळीला
साधू-संतांचा वारसा
श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पिंपरी चिंचवडच्या भूमीला संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या आळंदी आणि देहू या गावांचे सान्निध्य लाभले आहे. हे तीनही सत्पुरुष साधू आणि संत म्हणून वंदनीय आहेतच; पण साहित्यक्षेत्राच्या दृष्टीने ते साहित्यिकही होते. त्यामुळे त्यांच्या साहित्याचा महान वारसा इथल्या मातीत झिरपला अन् कळत-नकळत अनेक पिढ्यांनी त्यापासून प्रेरणा घेतली. अनेक खेड्यांमध्ये विखुरलेली; परंतु औद्योगिक क्षेत्रामुळे श्रमिकांची उद्योगनगरी म्हणून ओळख असलेली ही नगरी सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न पुण्याजवळ असल्याने तिथल्या साहित्यसंपन्नेची छाया या परिसराला लाभली आहे.
- प्रदीप गांधलीकर, ज्येष्ठ साहित्यिक
महासाधू मोरया गोसावी यांना दैवी प्रतिभा लाभली होती. त्यांच्या गणेशभक्तिपर रचनांचा प्रसार अवघ्या महाराष्ट्रभर झाला. त्यांच्या प्रतिभेचा वारसा त्यांच्यानंतरच्या काही पिढ्यांमध्ये होता. पेशवेकाळात मनोहर लक्ष्मण पुराणिक नावाचे कवी चिंचवड येथे वास्तव्यास होते. त्यांनी प्राकृत अभंगरचना, श्लोक इत्यादी काव्यप्रकारांमध्ये विपुल लेखन केले; परंतु दुर्दैवाने कालओघात त्यापैकी बहुतांश साहित्य नष्ट झाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी केलेल्या संशोधनातून कवी मनोहर यांच्या काही दुर्मीळ रचना प्रकाशात आल्या. स्वातंत्र्यावेळी झालेल्या फाळणीतून सिंधी समाज भारतात मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाला. पिंपरीमध्ये स्थायिक झालेल्या या समाजातील श्रीचंद संघदिल या सिंधी साहित्यिकाने काही ग्रंथरचना केल्याचे आढळून आले. साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. पिंपरी चिंचवड शहराची गणना स्मार्ट सिटीमध्ये झाली असली, तरी ही नगरी श्रमिकांच्या श्रमावर अन् घामावर उभी आहे, ही बाब विसरून चालणार नाही. त्यामुळे साहित्यिकांनी आपल्या अभिव्यक्तीतून श्रमिकांच्या सुख-दुःखाचे वास्तव चित्रण केले तरच ही साहित्य चळवळ सफल झाली, असे म्हणता येईल.
चळवळीचा श्रीगणेशा
पिंपरी चिंचवडमधील साहित्य चळवळीची सुरुवात प्रामुख्याने १९७२ मध्ये चिंचवडगावात स्थापन झालेल्या ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ या संस्थेच्या माध्यमातून झाली. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार हे समितीचे अध्यक्ष होते; तर नंतरच्या काळात सामाजिक कार्यामुळे नावारुपाला आलेले गिरीश प्रभुणे हे त्या समितीचे कार्यवाह होते. या समितीने साहित्यविषयक अनेक उपक्रम राबविले. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील अनेक प्रथितयश आणि नामवंत साहित्यिकांचा राबता या भूमीत सुरू झाला. स्मारक समितीने ‘क्रांतिदूत’ हा हस्तलिखित अंक प्रकाशित केला. पुढील वर्षी राज्यस्तरीय कथास्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या कथाकारांचा एक कथा विशेषांक छापील स्वरुपात पु. भा. भावे यांच्या हस्ते प्रकाशित केला. १९७३ मध्ये गिरीश प्रभुणे यांनी ‘मधुमिलिंद’ या नावाने पहिले मासिक नियतकालिक सुरू केले; परंतु आर्थिक अडचणींमुळे एका वर्षांनंतर ते बंद पडले. १९७९ मध्ये अशोक त्रिभुवन यांनी ‘पिंपरी चिंचवड साहित्य संघ’ स्थापन केला.
संमेलनांना प्रारंभ
पिंपरी चिंचवड शहरातील पहिले साहित्य संमेलन ‘दलित साहित्य संमेलन’ या नावाने चिंचवड येथे १९७९ मध्ये भरविले. या संमेलनाला सुमारे पाच हजार रसिकांनी हजेरी लावली होती. डॉ. गंगाधर पानतावणे संमेलनाचे अध्यक्ष होते; तर प्रा. गंगाधर गाडगीळ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. गो. नी. दांडेकर प्रमुख पाहुणे होते. साहित्याच्या सर्व प्रवाहांतील साहित्यिक उत्साहाने सहभागी झाले होते. अर्थातच त्यासाठी कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न केले होते.
संमेलनांचा प्रवास
पिंपरी चिंचवडमध्ये २६ जुलै १९८१ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपरी चिंचवड शाखा स्थापन करण्यात आली. प्रा. वसंत कानेटकर यांच्या हस्ते तिचे उद्घाटन झाले. गिरीश प्रभुणे हे पहिले शाखाध्यक्ष होते. अल्पकाळातच कवयित्री पद्मा गोळे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आयोजित केले गेले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३० आणि ३१ जानेवारी १९८२ रोजी चिंचवड येथे शाहिरी संमेलन झाले. यात सुमारे अडीचशे शाहिरांनी सहभाग घेतला. यासाठी शाहीर योगेश आणि शाहीर हिंगे यांनी पुढाकार घेतला. २८ ऑगस्ट १९८८ रोजी एच. ए. कंपनीच्या सभागृहात प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. त्यामध्ये प्रथितयश कवींसोबत अनेक नवोदित कवी सहभागी झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने ३ आणि ४ जून १९८९ रोजी कविवर्य वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली पहिले विभागीय साहित्य संमेलन घेतले. महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक आणि स्थानिक साहित्यिक यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागामुळे पिंपरी चिंचवडच्या भूमीत खऱ्या अर्थाने साहित्य चळवळ रुजली. त्यामुळे अनेक स्थानिक निवोदित लेखक, कवींना प्रेरणा मिळाली.
अनेक साहित्यिक उपक्रम
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेने अनेक साहित्यिक उपक्रम राबविले. गेल्या वर्षी कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सुमारे शंभर कविता, विविध क्षेत्रातील शंभर नामवंत व्यक्तींकडून सादर करून त्यांना अभिनव पद्धतीने अभिवादन करण्यात आले. या कविता आणि मान्यवरांनी शांताबाईंच्या सांगितलेल्या आठवणींचा ‘बकुळगंध’ हा अतिशय दर्जेदार आणि संग्राह्य ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या शाखेने महापालिकेच्या सौजन्याने शांता शेळके सभागृह हे साहित्यविषयक कार्यक्रमांसाठी मध्यवर्ती ठिकाणी कार्यान्वित केले आहे. तसेच साहित्यविषयक उपक्रमांचे सातत्य राखले आहे.
अन्य संस्थांचे योगदान
- महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे यशस्वी घोडदौड सुरू होण्यापूर्वी शहरातील विविध छोट्यामोठ्या संस्थांची वाटचाल सुरू होती. भोसरीत कवी कालिदास प्रतिष्ठानने ६ फेब्रुवारी १९९४, ५ डिसेंबर १९९६ आणि ८ फेब्रुवारी १९९८ अशी तीन साहित्य संमेलने यशस्वी करून दाखवली.
- बंधुता साहित्य परिषदेने वैचारिक बांधिलकी हा स्थायिभाव जोपासत पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील अन्य भागात दरवर्षी संमेलने घ्यायला सुरुवात केली; ही परंपरा आजतागायत कायम आहे. धर्म आणि जातीच्या भिंती ओलांडून बंधुभाव जोपासला जावा, या उद्देशाने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन प्रत्येक महिन्याला बंधुता प्रतिष्ठानने घेतलेला ‘काव्यपंढरी’ हा उपक्रम अतिशय प्रभावी ठरला.
- नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘नक्षत्रांचे देणे’ हा काव्यमंच बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे. शब्दगंध साहित्य कला सहयोग ही संस्था साहित्यिक उपक्रम तसेच ‘छांदसी’ हे अनियतकालिक चालवत होती.
- कविवर्य नारायण सुर्वे यांच्या प्रेरणेने शहरातील कामगार साहित्यिकांनी कामगारांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळावा म्हणून महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) या संस्थेच्या माध्यमातून कामगार साहित्य चळवळ विकसित केली. एक मे या कामगार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते.
- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या (पिंपरी चिंचवड शाखा) माध्यमातून ग्रामसंस्कृती आणि शिवार साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी काव्यजागर संमेलने घेते. नारायण सुर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षकप्रतिभा संमेलन घेतले जाते.
- महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषदेच्या माध्यमातून श्रम उद्योग परिषद भरवून समाजातील उपेक्षित कष्टकरी वर्ग, कामगार, उच्च व्यवस्थापनातील अधिकारी, कारखानदार किंवा लघुउद्योजक यांना एकाच व्यासपीठावर निमंत्रित करून वैचारिक आदानप्रदान करण्यात येते. आशिया मानवशक्ती विकास संस्था समाजात जाणकार नेतृत्व घडावे, सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि प्रबोधन व्हावे, म्हणून वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी करते. या संस्थांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरात अनेक दिग्गज साहित्यिक आणि विचारवंतांचे विचारमंथन ऐकण्याची संधी स्थानिक साहित्यिक अन् कार्यकर्त्यांना मिळते.
- त्रिमिती, कीर्तिश्री, सांस्कृतिक कलामंच अशा काही संस्था कालौघात बंद झाल्या, तरी त्यांची जागा अनेक नव्या संस्थांनी घेतली आहे. ‘रुद्रंग’ ही अभिवाचनातून अभिजात साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवणारी संस्था आणि ज्येष्ठ नागरिकांचा अतिशय उत्साहाने साहित्यविषयक उपक्रम राबविणारा ‘शब्दरंग साहित्यकट्टा’ यांचे योगदान दखलपात्र आहे.
- तीस वर्षांपासून कार्यरत ‘नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाने’ श्रावणी काव्यस्पर्धा, कविता आणि विविध साहित्यप्रकारांवरील कार्यशाळा, वैशिष्ट्यपूर्ण साहित्य उपक्रम आयोजित करून नवोदित साहित्यिकांना घडवत आहे.
- अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत मध्यरात्री कविसंमेलन, उंटावर बसून काव्यवाचन, पावसात छत्री उघडून कविता सादरीकरण, चालत्या लोकलमध्ये कविसंमेलन, दिवाळी माध्यान्ह हे आगळेवेगळे कविसंमेलन अशा वैचित्र्यपूर्ण अन् अद्भुत कल्पना राबवून नवोदितांमधील काव्यप्रतिभेचा शोध घेणारी, ‘चला जाऊया ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी...’ यासारखे कृतज्ञतापर उपक्रम राबवणारी ‘शब्दधन काव्यमंच’ ही संस्था पंचवीस वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे.
- ‘शब्दब्रह्म’ संस्थादेखील निष्ठापूर्वक साहित्य चळवळ जोपासते आहे. समरसता साहित्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) प्रतिवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलन, ‘कवितेकडून कवितेकडे...’ हा अभिनव उपक्रम आणि काव्यमैफील करंडक अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे.
- ‘मधुश्री’, ‘अनुष्का’, ‘स्वानंद’, ‘अहिराणी कस्तुरी’, ‘स्वयंसिद्धा’, ‘कर्मयोगिनी’ या सर्वस्वी महिला संचलित साहित्य संस्था आपले वेगळेपण टिकवून आहेत. साहित्य आणि पर्यटन यांचा मेळ साधून ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान’, ‘शब्द साहित्य मंडळ’ साहित्य संमेलनांचे आयोजन करीत असतात.
- महाराष्ट्र साहित्य परिषद (भोसरी शाखा) या संस्थेने काही काळ दर्जेदार संमेलनांचे आयोजन केले. ‘संस्कार भारती’ या संस्थेने साहित्यविषयक उपक्रमांचे आयोजन करायला सुरुवात केली आहे.
- ‘इंद्रायणी साहित्य परिषद’ या संस्थेने चार वर्षांपासून इंद्रायणी साहित्य संमेलनांचे दर्जेदार आयोजन करून साहित्यरसिकांना आकृष्ट केले आहे.
- ‘कलारंजन’ प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड या नगरीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करते; तर ‘गझलपुष्प‘,‘समिधा गझल मंच’सारख्या संस्था विशिष्ट काव्यप्रकाराच्या प्रचार अन् प्रसार करण्यासाठी झटत आहेत.
- पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक छोट्या संस्था आपल्या परीने साहित्यसेवा करत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेने कला-सांस्कृतिक धोरण जाहीर केले. त्यात साहित्य क्षेत्राला समाविष्ट करून नवीन धोरण अंमलात आणावे, स्थानिक साहित्यिकांना कार्यक्रमासाठी सवलतीत सभागृह उपलब्ध व्हावे, यांसह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी - चिंचवडमध्ये घेण्यात यावे या महत्त्वाकांक्षी मागण्यांसाठी सुमारे बावीस साहित्य संस्था एकत्रित येऊन त्यांनी ‘पिंपरी चिंचवड साहित्य संवर्धन समिती’ची स्थापना केली.
- डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, पिंपरी यांनी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद स्वीकारले. पिंपरीत १५ ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत ‘न भुतो न भविष्यती’ अशा दिमाखदारपणे हे साहित्य संमेलन संपन्न झाले. हा पिंपरी चिंचवडच्या साहित्य चळवळीतला कळसाध्याय म्हटला पाहिजे. कारण, त्यापासून प्रेरणा घेऊन ही साहित्य चळवळ पुढे जोमाने विस्तारताना दिसते आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.