पिंपरी, ता. १८ ः शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी (ता. १८) चिंचवडचे किमान तापमान यावर्षीचे थंडीतील सर्वात कमी म्हणजेच १४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. वाढलेल्या थंडीमुळे पहाटे व रात्री जास्त गारठा जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी वर्तवली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये पारा दोन अंशांनी खाली आल्याचे आकडेवारी सांगते. किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही घट झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून शहरातील तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरातील किमान तापमानाचा पारा आठ अंशानी घसरल्याने शहरात थंडीने बस्तान बसवल्याचे चित्र आहे. पहाटे वाढणारी थंडी दुपारपर्यंत जाणवू लागली आहे. त्यामुळे बाहेर पडताना नागरिक स्वेटर, शाल, मफलर, कानटोपी असा पोशाख करूनच बाहेर पडताना दिसले. थंडीचा कडाका रात्रीही जाणवत असल्याने रात्री दहानंतर रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून येत आहे. थंडीमुळे पहाटे बागा व उद्यानांमध्ये मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मात्र वाढली आहे.