(वास्तू पुरवणी पान एक)
--
वाहतूक कोंडीवर
मेट्रो सक्षम उपाय
वाढते शहरीकरण आणि नागरीकरण हे कोणत्याही प्रदेशाच्या प्रगतीचे आणि बदलाचे द्योतक असते. शहर केवळ लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार यामध्ये वाढत नाही, तर ते स्वतःची एक नवी आणि ठळक ओळख निर्माण करते. पिंपरी चिंचवड शहराने देखील अशीच नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून अल्पावधीच आपली वेगळी ओळख निर्माण केली. येथील वाहतूक कोंडीवर मेट्रो सेवा सक्षम उपाय ठरणार आहे.
- श्रावण हर्डीकर, महाव्यवस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
वि विध शैक्षणिक संस्था, अद्ययावत वैद्यकीय उपचार केंद्रे (रुग्णालये), मनोरंजन आणि सांस्कृतिक उपक्रम केंद्रे, न्यायालयीन व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे पिंपरी चिंचवड शहराची ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक शिक्षण, रोजगारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झाले आहेत. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढत असून, २५ लाखांवर वाहनांची संख्या गेली आहे. शहरातील रुंद आणि प्रशस्त रस्ते, ३५ पेक्षा अधिक पूल, उड्डाणपूल शहराच्या वाहतुकीला गती देतात. मात्र, असे असताना, शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे दररोज वाहतूककोंडी होत असल्याने हे प्रशस्त रस्ते आणि पूल अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.
मेट्रोचा प्रवास
आजच्या वेगवान जीवनात नागरिकांना शैक्षणिक संस्था, नोकरीची ठिकाणे, व्यापार केंद्र, बाजारपेठा, दवाखाने किंवा आपल्या नियोजित ठिकाणी सहज, वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचता यावे, यासाठी एक वेगवान, सक्षम, कार्यक्षम आणि अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज होती. हीच गरज ओळखून नागपूर, मुंबईपाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेण्यात आला.
- सुरुवातीला पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांना मंजुरी मिळाली. पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट या १६.५९ किलोमीटर लांबीच्या कामाला सुरुवात झाली. पिंपरीपासून रेंजहिल्सपर्यंत उन्नत व तिथून स्वारगटेपर्यंत भूमिगत मार्गाचे बांधकाम करण्यात आले. या मार्गिकेवर १५ स्थानके विकसित करण्यात आली.
- पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या १२.२ किलोमीटरदरम्यान ६ मार्च २०२२ रोजी मेट्रो सेवा सुरू झाली. तर १ ऑगस्ट २०२३ रोजी दुसऱ्या टप्प्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट (६.९१ किलोमीटर) मेट्रो सेवा सुरू झाली. तर ६ मार्च २०२४ रोजी तिसऱ्या टप्यात रूबी हॉल ते रामवाडीपर्यंत (५.५ किलोमीटर) मेट्रो सेवा सुरू झाली. त्यामुळे वनाज ते रामवाडीपर्यंतचा १६.५ किलोमीटरचा पहिला मेट्रो मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला. यामुळे पिंपरी येथून थेट पुणे सिव्हिल कोर्ट तेथून कोथरूड, वनाज, पुणे स्टेशन आणि रामवाडीपर्यंत जाणे सोयीचे झाल्यामुळे मेट्रोने प्रवास करण्याकडे नागरिकांचा कल वाढत गेला.
- सध्या प्रतिदिनी दीड लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत १० कोटी ८७ लाख ३९ हजार ३६६ प्रवाशांनी प्रवास केला. पिंपरी मेट्रो स्थानकावरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मेट्रोमुळे शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय स्तरावर मोठे आणि सकारात्मक बदल होत आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुणे या जुळ्या शहरांसाठी ही ‘जीवनवाहिनी’ ठरत आहे. आज या शहरांमध्ये महामेट्रोचे जाळे विस्तारत आहे आणि हे जाळे पिंपरी-चिंचवडच्या विकासाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल.
डिजिटल तिकीट
पुणे मेट्रो प्रशासनाने कागदविरहित आणि जलद तिकीट काढता यावे, म्हणून डिजिटल तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये मोबाईल ॲप, व्हॉटस्ॲप, महामेट्रो कार्डद्वारे आणि स्थानकावरील तिकीट मशिनच्या माध्यमातून ऑनलाइन तिकीट काढता येत आहे.
तर स्थानकावर जाऊन ऑनलाइन किंवा रोख पैसे देऊन ऑफलाइन कागदी तिकीट काढता येत आहे. दररोजच्या धावपळीच्या जीवनात तिकीट रांगेत थांबून तिकीट काढण्यापेक्षा प्रवासीही डिजिटल तिकीटाला पसंती देत आहे. ६९,८०७ प्रवाशांनी वन पुणे कार्ड, २१,४४० एमटीएस कार्ड आणि ३९,१९४ विद्यार्थ्यांनी विद्यार्थी कार्ड घेतले असून त्याचा वापर करत आहेत. एकूण प्रवाशांच्या सुमारे ७३.७५ टक्के प्रवासी डिजिटल माध्यमांचा वापर करून तिकीट काढत आहे. यावरून पुणे मेट्रोचा प्रवास कागदविरहित तिकीटाकडे प्रवास सुरू असल्याचे दिसून येते.
कोंडीतून मुक्ती; वेळेची बचत
पिंपरी चिंचवड एक औद्योगिक केंद्र असल्यामुळे येथे दररोज लाखो नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्त प्रवास करतात. वाढत्या खासगी वाहनांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे. मेट्रोने या समस्येवर प्रभावी तोडगा काढला आहे.
जलद कनेक्टिव्हिटी
मेट्रोमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ अनेक पटींनी कमी झाला आहे. उदाहरणार्थ, पिंपरी-चिंचवड शहरातून थेट पुणे शहराच्या मुख्य भागापर्यंत अवघ्या २५ ते ३५ मिनिटात पोहोचणे शक्य होत आहे.
निश्चित वेळापत्रक
मेट्रोचे वेळापत्रक निश्चित असल्यामुळे प्रवाशांना वेळेवर पोहोचण्याची खात्री मिळते. ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील ताण कमी होतो आणि वेळेचे उत्तम नियोजन साधता येते.
वाहनांचा कमी वापर
अनेक नागरिक मेट्रोचा वापर करू लागल्याने रस्त्यांवरील वाहनांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याने काही प्रमाणात पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी झाली आहे.
रिअल इस्टेटला चालना
मेट्रो स्थानकांच्या आसपासच्या भागांमध्ये व्यावसायिक आणि निवासी मालमत्तांचे मूल्य वाढले आहे. मेट्रोच्या सोयीमुळे लोक आता शहराच्या बाहेरच्या भागातही घर घेण्यास तयार आहेत, ज्यामुळे शहराचा समतोल विस्तार होत आहे.
व्यवसाय आणि व्यापार
मेट्रोमुळे व्यावसायिक ठिकाणे, मॉल्स आणि बाजारपेठांमध्ये ग्राहकांची ये-जा वाढली आहे, परिणामी व्यापार-उदीमाला अधिक गती मिळाली आहे. मेट्रो स्थानकांजवळ नवीन छोटी-मोठी दुकाने आणि व्यवसाय उभे राहत आहेत.
रोजगार निर्मिती
मेट्रो प्रकल्पाच्या बांधकाम, संचालन आणि देखभाल या टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
सुरक्षित प्रवास
पर्यावरणपूरक आणि सुरक्षित प्रवास आजच्या काळात पर्यावरणाचे संरक्षण करणे ही मोठी जबाबदारी आहे. मेट्रो ही एक प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे.
कार्बन उत्सर्जन कमी
मेट्रो इलेक्ट्रिक असल्यामुळे खासगी वाहनांच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन अत्यंत कमी होते. ज्यामुळे शहराची हवा अधिक स्वच्छ राहण्यास मदत होत आहे. हे पिंपरी-चिंचवड शहराला एक स्मार्ट आणि हरित शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
सुरक्षितता
मेट्रो ही अत्यंत सुरक्षित वाहतूक व्यवस्था मानली जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही पाळत आणि प्रशिक्षित कर्मचारी यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळते.
जीवनमान सुधारणा
मेट्रोमुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी प्रवास करणे सोपे आणि परवडणारे झाले आहे. मेट्रो स्थानके शहराच्या मुख्य भागांना जोडत असल्यामुळे सामान्य नागरिकांसाठी उच्च-गुणवत्तेच्या आरोग्य सेवा, शिक्षण आणि मनोरंजनाच्या संधींपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे.
महिला-वृद्धांसाठी सुविधा
मेट्रोमध्ये महिला आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा दिल्या आहेत. त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलेले असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रवासाची गुणवत्ता वाढली आहे.
भवितव्याचा वेध
मेट्रोचे जाळे केवळ शहराच्या सध्याच्या गरजा पूर्ण करत नाही, तर ते शहराच्या भविष्यातील वाढीचाही विचार करत आहे. महामेट्रोने सुमारे ४१ किलोमीटरचा निगडी ते चाकण मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. या मार्गाचा डीपीआर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सुपूर्त केला आहे. डीपीआरमध्ये महापालिका प्रशासनाने काही बदल सुचविले आहेत. हे बदल करून डीपीआर अंतिम करण्याचे काम सुरू आहे. विस्तारित मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवडच्या आणखी अंतर्गत भागांना आणि उपनगरांना मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
(शब्दांकन ः अविनाश ढगे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.