पिंपरी, ता. १८ : ‘फ्रेशर्स स्कॅम’नंतर फोरम फॉर आयटी एम्प्लॉयिज या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी आयटी क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी एक वेगळी समिती नेमावी, अशी मागणी आयटीयन्सनी कामगार मंत्री यांच्याकडे केली.
हिंजवडीत नोकरी देण्याच्या आमिषाने सुमारे ४५० पेक्षा अधिक आयटी अभियंत्यांना लाखो रुपयांना फसविण्यात आले. या प्रकाराची माहिती फुंडकर यांना देण्यात आली. ‘‘अशा प्रकरणांत पोलिस तक्रार होते. मात्र, आयटी कंपन्यांकडून अनेकदा कर्मचाऱ्यांकडून जबरदस्ती राजीनामे घेतले जातात. तसेच ले ऑफच्या नावाखाली अनेकांना एकाचवेळी नोकरी सोडावी लागते. याची तक्रार कामगार आयुक्तांकडे होते. मात्र, या तक्रारी पोलिस स्टेशनमध्येही नोंदविल्या जाव्यात,’’ अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
‘‘देशात आयटी क्षेत्र हे फार वेगाने वाढत आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रात अभियंत्यांची फसवणूक होण्याच्या घटना वाढत आहेत. तसेच नोकरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कंपन्याकडून अचानक राजीनामे घेतले जात आहेत. त्यामुळे या घटनांची नोंद व्हावी त्यावर कारवाई व्हावी यासाठी आयटीक्षेत्रासाठी एक वेगळी समिती नेमावी, अशी मागणी आम्ही आय कामगार मंत्री यांच्याकडे केली. त्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे,’’ असे फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितले.