पिंपरी, ता. १८ ः पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर चिखल होत असल्याने वाहनचालक आणि त्यातही दुचाकीस्वारांना वाहने चालविणे तर पादचाऱ्यांना चालणे जिकिरीचे होत आहे. प्रामुख्याने बांधकाम साहित्याची ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे हा चिखल पसरत आहे. यासाठी ठोस गंभीर कारवाई करणे अपेक्षित असलेली महापालिका थंडच आहे. पालिका केवळ दंड ठोठावत असल्याने निसरड्या रस्त्यांवरील चिखलात खंड पडत नसल्याचे धोकादायक चित्र अनेक ठिकाणी दिसते आहे.
बांधकामाच्या ठिकाणची माती अवजड वाहनांच्या चाकांना लागून रस्त्यावर येते. पाऊस पडल्यानंतर चिखल रस्त्यावर पसरतो. काही ठिकाणी पावसाळी चेंबर, वाहिन्या, पदपथ तुटल्यामुळे किंवा उखडल्यामुळे यात भर पडली आहे. अनेक ठिकाणी विकासकामे रखडली आहेत. त्यासाठी लागणारे खडी, वाळूसारखे साहित्य कामाच्या ठिकाणीच पडून आहे. यानंतरही महापालिका दंडाशिवाय ठोस कारवाई नसल्याने हे चित्रही बदलण्याची चिन्हे नाहीत.
सध्या शहरात अनेक ठिकाणी नवीन गृहनिर्माण प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. उपनगरांसह मध्यवर्ती भागांतही बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. तेथे साहित्याची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या वाढतच आहे. ही वाहने बांधकामाच्या ठिकाणहून बाहेर पडताना त्यांची चाके स्वच्छ असणे नियमानुसार अनिवार्य आहे. प्रत्यक्षात बहुतांश आरएमसी प्लांट (रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्प) व बांधकामाच्या ठिकाणी टायर धुण्याची सुविधा उभारण्याची तसदी संबंधितांनी घेतलेली नाही. त्यामुळे गाड्यांच्या चाकांना चिखल, माती, व ओले सिमेंट लागलेले असते. हाच चिखल, राडारोडा, खडी वाहतूकीदरम्यान रस्त्यावर पसरते. परिणामी रस्ते निसरडे होऊन अनेकदा दुचाकी घसरून किरकोळ अपघात होतात. चिखलामुळे रस्तेही खराब होत आहेत.
कारवाई होऊनही समस्या कायम
हिंजवडीतील फेज ३ आणि माण भागामध्ये रस्त्यावर चिखल झाल्याने अपघात होत होते. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर एमआयडीसीने तीन विकसकांना नोटिसा बजावल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही संबंधित ठिकाणी भेट देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. पिंपरी-चिंचवड शहरात मात्र यासाठी संबंधित यंत्रणांनी पावले टाकलेली नाहीत. सध्या महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे केवळ दंडात्मक कारवाई होत असल्याने समस्या कायम आहे.
ऊन पडल्यावर धुळीचा त्रास
बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे पडणारा चिखल पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पसरतो. दुसरीकडे ऊन पडल्यावर माती वाळून ती हवेत उडते. त्यामुळे धुळीचे आणि पर्यायाने प्रदूषणाचे प्रमाण वाढते. एका बाजूला महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून हवा शुद्ध करणारी यंत्रणा उभारली आहे, मात्र मुळात धूळ रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याकडे पालिकेचे दुर्लक्षच होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
ऑक्टोबर २०२४ पासूनची कारवाई
एकूण कारवाई ः ३१३ वाहने व आस्थापने
जमा झालेला दंड ः १६ लाख ५१ हजार
---
शहरात अनेक ठिकाणी बांधकामे, विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक रस्त्यांवर अनेक ठिकाणी राडारोडा पडलेला असतो. दुसरीकडे बांधकामांच्या ठिकाणावरून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर चिखल पसरतो आहे. पावसाळ्यात चिखल पसरून रस्ता निसरडा होतो, तर ऊन पडल्यावर धूळ उडून त्रासाला सामोरे जावे लागते. प्रदूषण वाढण्याचे हे सुद्धा एक कारण आहे.
- प्रशांत राऊळ, पर्यावरणप्रेमी
---
शहरातील रस्त्यांवर चिखल व राडारोडा होण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दोन पथके नेमण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.