पिंपरी, ता. २० ः पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट स्वरूप देण्यासाठी २०१९-२० मध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत विविध भागांत ६० व्हिज्युअल मास डिस्प्ले (व्हीएमडी) उभारण्यात आले. मात्र, काही वर्षांतच ही यंत्रणा निकामी होत चालली असून ६० पैकी केवळ १५ स्क्रीन चालू स्थितीत आहेत. त्यामुळे करोडो रुपये खर्चून उभारलेल्या ‘व्हीएमडी’वर प्रशासकीय अकार्यक्षमतेचेच ‘दर्शन’ होत आहे.
सार्वजनिक उपयुक्त माहिती, शासकीय संदेश आणि जाहिराती नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने महापालिकेने व्हीएमडी यंत्रणा उभी केली. मात्र, सध्या त्यापैकी अनेक व्हीएमडी तांत्रिक त्रुटींमुळे अर्धवट चालू तर काही अर्धवट बंद अवस्थेत आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या डिस्प्ले झाकत असल्याने नागरिकांना स्क्रीनवरची माहिती दिसतच नाही. त्यामुळे जाहिरातींचा प्रभाव कमी झाला आहे. जाहिरातदारांचा प्रतिसादही घटला आहे. अनेकांनी या माध्यमातून जाहिरात देणे टाळले आहे. यंत्रणा जुनी झाल्यामुळे तिची दुरुस्ती करणे कठीण झाले आहे. त्यातच स्मार्ट सिटी प्रकल्पाचा कालावधी संपूनही व्हीएमडीचा ताबा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. परिणामी, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोण सांभाळणार ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
जाहिरातदारांचा अल्प प्रतिसाद
जाहिरातदारांच्या प्रतिसादाअभावी प्रशासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. माहिती प्रसारित करण्याचे महत्वाचे साधन अकार्यक्षम झाले आहे. तांत्रिक दृष्ट्या जुनी यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे सध्या ती दुरुस्त करताना तांत्रिक दृष्ट्या अडथळे येत आहेत. या कामासाठी बराच वेळ लागणार असून त्याचा ताबा महापालिकेकडे आल्यानंतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी तज्ञ संस्थेमार्फत केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
अर्धी स्क्रीनच बंद
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या पॅन सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट जाहिरात सुविधा उपलब्ध करण्यासाठी शहरात ५० किऑक्स आणि ६० व्हिज्युअल मास डिस्प्ले (व्हीएमडी) उभारण्यात आले. वायफाय पोल आणि स्मार्ट पोलसह या प्रकल्पावर तब्बल २२५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या व्हीएमडीवर दररोज हवामानाचा अंदाज, प्रदूषणाची पातळी, तसेच महापालिका आणि पोलिसांकडून दिले जाणारे विविध संदेश नागरिकांना दाखवले जातात. मात्र, अर्धी स्क्रिन बंद असल्यामुळे ते संदेश वाचणे किंवा पाहणे कठीण झाले आहे.
इथे आहे व्हीएमडी सेवा
भक्ती - शक्ती, चिंचवड स्टेशन, पिंपरी चौक, निगडी प्राधिकरण, रावेत, चाफेकर चौक, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी गाव, वाकड, डांगे चौक, किवळे, पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, रक्षक चौक, दापोडी, भोसरी, दिघी, तळेगाव दाभाडे, चिखली, शाहूनगर, मोशी, तळवडे आयटी पार्क.
स्क्रिनसमोरील अडथळे
- शहरातील ६० व्हीएमडींपैकी केवळ १५ ठिकाणचेच सुरू
- तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणची यंत्रणा बंद
- अनेक ठिकाणी स्क्रीन अर्धी सुरू, अर्धी बंद
- झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे स्क्रीन झाकोळल्या
- जाहिरातदारांचा अत्यल्प प्रतिसाद
- दर्जेदार सेवा न मिळाल्याच्या तक्रारी
व्हीएमडी यंत्रणेत तांत्रिक त्रुटींमुळे देखभाल व दुरुस्ती प्रक्रियेत काही अडथळे आले आहेत. मात्र, स्मार्ट सिटीकडून लवकरच ही यंत्रणा ताब्यात घेऊन आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल. सुरुवातीला बसविण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे दुरुस्तीमध्ये अडचणी येत असल्या तरी ही यंत्रणा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.
- राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका
PNE25V51608, PNE25V51607