पिंपरी, ता. २३ ः शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारपासून (ता. २२) प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नऊ दिवसांच्या उपवासाच्या भाज्या व पदार्थांना मागणी वाढली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात रताळे, बटाटे, भेंडी, भगर, काशीफळ दाखल झाले. मात्र, दोनच दिवसांत उपवासाच्या पदार्थांचे दर वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
शारदीय नवरात्रोत्सवात बहुतांश नागरिकांचे उपवास असल्याने या पदार्थांच्या खरेदीला ग्राहकांची गर्दी होत आहे. स्त्रीशक्तीच्या आराधनेचा कालावधी असलेल्या नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने महिला पुरुषदेखील नऊ दिवस उपवास करतात. काहीजण एकवेळ जेवून तर काहीजण दोन्ही वेळ केवळ फळे किंवा उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे सध्या बाजारात व मंडईत रताळे, काशीफळ, भूईमूग शेंगा, भेंडी, साबुदाणा, शेंगदाणे, वरईची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून मागणीही वाढली आहे. सोमवारी बाजारात भेंडीची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. मात्र, मागणीमुळे भाव चढेच होते.
साबुदाणाचे दर घसरले
मागच्या वर्षी साबुदाण्याचे दर ९० ते ९५ रुपयांवर गेला होता. पण, यंदा साबुदाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दर घसरले असून प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांवर आले आहेत. शेंगदाण्याचे दरही ११० ते १२० रुपयांवर आले असल्याचे किराणामाल असोसिएशनचे सचीव सुशील बजाज यांनी सांगितले.
तयार पीठाला मागणी
बहुतांश महिलांना नोकरी, व्यवसायामुळे उपवासाचे पीठ बनवण्यासाठी वेळ नसतो किंवा पीठ बनविण्याची यंत्र नाही. त्यामुळे साबुदाण्याचे पीठ, भगरीचे पीठ, राजगिऱ्याच्या तयार पीठाची अधिक मागणी आहे. साबुदाण्याचे भाव घसरल्याने पीठाचे दर कमी झाले आहेत. तसेच बटाट्याचे वेफर्स, केळीचे वेफर्स, बटाटा चिवडा, साबू चिवडा या तयार पदार्थांनी मागणी वाढली आहे.
उपवासाचे पदार्थ
राजगिरा, साबुदाणा, भगर, शेंगदाणा, राजगिरा लाडू, बटाटा व केळी वेफर्स, उपवासाचा चिवडा, साबुदाणा चिवडा, राजगिरा वडी, शेंगदाना चिक्की, भुईमूग शेंगा, रताळे, लाल भोपळा, केळीसह अन्य फळे.
उपवासाच्या पीठांचे दर (प्रतिकिलो)
राजगिरा पीठ ः १८० रुपये
भगर (वरई) पीठ ः १२० रुपये
--