पिंपरी, ता. २३ ः पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासक म्हणून आयुक्तांच्या हाती आहे. वर्षानुवर्षे रखडलेले निर्णय त्यांनी घेतले, त्यांची कार्यवाही सुरू आहे. काही प्रकल्प दृष्टिपथात आले आहेत. मात्र, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच विकास कामे झालीत’ अशी वातावरण निर्मिती इच्छुकांकडून सुरू असून, श्रेयवादही रंगला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घ्याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकही ३१ जानेवारी पूर्वी म्हणजे चार महिन्यांत होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना, मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामध्ये माजी नगरसेवकांसह नवीन इच्छुकांची संख्याही अधिक आहे. त्यासाठी ‘कार्य अहवाल’ काढण्याबरोबरच सोशल मीडियावर सर्व मंडळी कार्यरत झाली आहे. जनसंपर्क कार्यालये सुरू केली आहेत. सण-उत्सवांच्या निमित्ताने विविध मंडळे, संस्थांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली जात आहे. पत्रके काढून केलेल्या कामांची ‘जाहिरात’ही केली जात आहे. यामध्ये प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या कामांचाही समावेश केला जात आहे. त्यामुळे ‘कामे महापालिकेची आणि श्रेयवाद इच्छुकांचा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशी कामे, असे श्रेय
- रस्ते ः बहुतांश रस्ते कॉंक्रिटचे केले जात आहेत. अरुंद गल्ली-बोळांमध्ये पेव्हिंग ब्लॉकचा वापर केला जात आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी आपणच पाठपुरावा केला होता, असा दावा काही इच्छुक करत आहेत. त्यासंदर्भात संबंधित भागांमध्ये फलकबाजी करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- पदपथ ः शहरातील बहुतांश रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित केले जात आहेत. यात १२, १८ व २४ मीटर रुंदी रस्त्यांचा समावेश आहे. अशा रस्त्यांवर पदपथ, सायकल ट्रॅक, पार्किंग सुविधा, काही ठिकाणी नागरिकांना विश्रांतीसाठी दगडी बाकडे (कट्टे), वृक्षारोपण, शोभेची झाडे-झुडपे लावली जात आहेत.
- पथदिवे ः अर्बन स्ट्रीट डिझाईन धोरणानुसार रस्त्यांवरील पथदिवे व खांब बदलण्यात येत आहेत. काही ठिकाणी नव्याने टाकले जात आहेत. त्यांचा आकार व प्रकाशझोत यामुळे रस्त्यांचे सौंदर्य वाढत आहे. अशा रस्त्यांवरून रात्री जाताना किंवा शतपावली करणाऱ्यांना अधिक अल्हाददायक वाटत आहे.
- प्रकल्प ः वर्षानुवर्षे रखडलेले विविध प्रकल्प प्रशासकीय कार्यकाळात मार्गी लागले आहेत. त्यांची कामे पूर्णत्वाकडे आहेत. काहींची कामे सुरू आहेत. अशा प्रकल्पांमुळे शहराला वेगळी ओळख मिळणार आहे. अशा प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काही इच्छुकांकडून सुरू आहे.
सध्या सुरू असलेली विकास कामे
- दोन हरित सेतू प्रकल्प
- ४८.९४ किलोमीटर लांबीचे ३४ डीपी रस्ते
- वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २५ चौकांची कामे
- नवीन जलवाहिन्या व सांडपाणी वाहिन्या टाकणे
- ठिकठिकाणी नागरी आरोग्य केंद्र व आपला दवाखाना उभारणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.