पिंपरी, ता. २३ ः महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने ३० सप्टेंबरपूर्वी चालू वर्षाचा मिळकतकर ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्यांना सामान्य करात चार टक्के सवलत जाहीर केली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी अवघे सात दिवस उरले आहेत. ३० सप्टेंबरनंतर प्रत्येक महिन्याला दोन टक्के विलंब शुल्क (दंड) भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यापूर्वी मिळकत कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
शहरात निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मिळकत आहेत. कर वसुलीसाठी १८ विभागीय कार्यालयांमार्फत कामकाज सुरू आहे. ऑनलाइन पद्धतीने किंवा ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एक एप्रिल ते २२ सप्टेंबरपर्यंत ५९५ कोटी २४ लाख रुपये मिळकतकर महापालिकेकडे जमा झाला आहे.
थकबाकीदारांवर कारवाई
मिळकतकर थकबाकी २५ हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या मिळकतधारकांवर महापालिका कठोर कारवाई करणार आहे. यामध्ये बिगर निवासी मिळकतधारकांची वाहन जप्त करणे, नळजोड खंडित करणे यासह मिळकत जप्तीचा समावेश आहे, अशी कारवाई करण्याचा आदेश कर आकारणी व कर संकलन आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिला.
एप्रिलपासून २२ सप्टेंबरपर्यंत...
एकूण मिळकती ः ७ लाख २६ हजार
चालू वर्षीत करभरणारे मिळकतधारक ः ४ लाख ६१ हजार ५०३
ऑनलाइन कर भरून सवलत लाभार्थी ः ३ लाख ८० हजार ९४९
मालमत्ता कर हे महापालिकेच्या महसुलाचे प्रमुख साधन आहे. नागरिकांनी वेळेत कर भरल्यास विकासकामांना गती देता येईल. नागरिकांसाठी आणखी सुविधा निर्माण करता येतील. थकबाकीदारांनी विलंब न करता कर भरावा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका