पिंपरी-चिंचवड

बाजारपेठांसह ग्राहकांचा आनंदोत्सव

CD

पिंपरी, ता. २३ ः वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) सुधारणेचा परिणाम शहरातील बांधकाम क्षेत्रासह इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, कपडे, सौंदर्य प्रसाधने आदी बाबींवर दिसू लागला असल्याचे विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांनी सांगितले. बांधकामासाठी लागणारे साहित्य पूर्वीच घेऊन ठेवलेले असल्यामुळे तूर्त घरांच्या किंमती स्थिर राहतील. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे काही अंशी स्वस्त झाले असून कपड्यांच्या किंमतींवरही परिणाम झाला आहे. फॅन्सी कपड्यांच्या दरात वाढ झाली आहे; तर किंमती कमी झाल्याने वाहनांची मागणी वाढली आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर जीएसटीची पाच आणि १८ टक्के अशी द्विस्तरीय अंमलबजावणी सुरू झाली आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवनावश्यकसह अत्यावश्यक वस्तूंवरही झाला आहे. त्यामुळे कोणत्या वस्तू स्वस्त व कोणत्या वस्तू महाग झाल्या ?, कोणत्या वस्तूंच्या किंमती स्थिर आहेत ?, याची चर्चा पिंपरी चिंचवड शहरातही ऐकायला मिळत आहे.

बांधकाम क्षेत्रात स्थिरता; ग्राहकाचा लाभ
गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्राला वाढत्या बांधकाम खर्चाचा मोठा फटका बसला आहे. कच्चा माल, मजुरी आणि इतर खर्च वाढल्यामुळे घरांचे दर सतत वाढत राहिले. त्याचा ग्राहकांवर मोठा आर्थिक ताण पडला. अशा परिस्थितीत सरकारने सिमेंट, स्टील आणि कडप्पा यासारख्या बांधकाम साहित्यावरील जीएसटी दरात केलेली कपात हा काहीसा दिलासा ठरत आहे. त्यामुळे घरांच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता असून बांधकाम व्यावसायिकांनाही मर्यादित लाभ मिळू शकतो. मात्र, बांधकाम क्षेत्रासाठी जीएसटी कपात पुरेशी ठरणार नाही. मोठा फायदा होण्यासाठी साहित्य दरांमध्ये स्थिरता आणि मजुरीवरील नियंत्रण गरजेचे आहे. अन्यथा ग्राहकांपर्यंत दरकपातीचा थेट फायदा पोहोचणे कठीण होईल. एकूणच, जीएसटी कपात ही सकारात्मक पायरी मानली जात असली तरी दीर्घकालीन स्थैर्यासाठी अधिक ठोस उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सिमेंट, स्टील आणि कडप्पा यासारख्या बांधकाम साहित्यावरील जीएसटी दरात कपात झाली आहे. त्याचा बांधकाम क्षेत्राला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. सध्या बांधकाम साहित्याचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळू शकतो. घरांच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्याचा ग्राहकांना फायदा होणार आहे.
- वसंत काटे, संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, यशदा रिअ‍ॅलिटी

इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त
काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के झाला आहे. त्यामुळे एअर कंडिशनर (एसी), डिशवॉशर, टेलिव्हिजन, मॉनिटर, प्रोजेक्टर यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. या उत्पादनांवर ग्राहकांची थेट १० टक्के बचत होणार आहे. त्यांना ५०० ते २० हजार रुपयांपर्यंत फायदा होणार असल्याने सामान्य वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती कमी करण्याची सूचना उत्पादक कंपन्यांनी डीलर्स व दुकानदारांना केली आहे. त्यामुळे सोमवारपासून एअर कंडिशनर, डिशवॉशर, टेलिव्हिजन यांची नवीन कर रचनेनुसार विक्री सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० हजार रुपये किंमतीच्या एअर कंडिशनर दरात चार हजार रुपये घट झाली. त्यांची सुमारे ३६ हजार रुपये किंमतीत विक्री झाली. टेलिव्हिजनच्या किंमती किमान दोन हजार रुपये कमी झाल्या. दसरा आणि दिवाळीत इलेक्ट्रॉनिक बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीमध्ये टेलिव्हिजन आणि एअर कंडिशनर यांचा वाटा ५० टक्के होता. या वस्तूच आता स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. आम्ही जीएसटीच्या १८ टक्के नवीन करानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री सरू केली आहे.
- रमेश चौधरी, संचालक, सूर्या इलेक्ट्रॉनिक्स

कपड्यांच्या किंमतीत फेरबदल
जीएसटीतील कपातीचा थेट परिणाम कपड्यांच्या किंमतीवरही झाला आहे. अडीच हजार रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर फक्त पाच टक्के
जीएसटी लागू झाल्याने या श्रेणीतील कपडे स्वस्त होऊन ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अडीच हजार रुपयांपेक्षा जास्त दराच्या कपड्यांवर जीएसटी दर १२ टक्क्यांवरून थेट १८ टक्के झाला आहे. रविवारपर्यंत एक हजार रुपये किंमतीच्या कपड्यांवर पाच; तर त्यापेक्षा महाग कपड्यांवर १२ टक्के जीएसटी आकारला जात होता. आता अडीच हजारांपर्यंतचे कपड्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. फॅन्सी कपड्यांच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच नामांकित कंपन्यांच्या कपड्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत.

नवीन कररचनेमुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, फॅन्सी कपड्यांसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. लग्नकार्यासाठी लागणाऱ्या कपड्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. साड्यांच्या किंमतीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
- मिलिंद शालघर, सचिव, युनायटेड रिटेल ट्रेड ॲण्ड गारमेंट असोसिएशन


वाहन उद्योगाला तेजी; किंमतीत घट
नव्या जीएसटीमुळे चारचाकी, दुचाकी आणि सायकलींच्या दरात मोठी घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम पिंपरी चिंचवड परिसरातील वाहन उद्योगावर दिसून येत असून विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. कमी दरांचा फायदा घेत ग्राहकांनी वाहनांची बुकिंग सुरू केले आहे. अनेकांनी महागड्या मॉडेल्सची निवड केली. एका घरात दोन वाहनांची खरेदी आज झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तरुणाई आणि नोकरदार वर्गामध्ये नवीन दुचाकींची मागणी वाढली आहे. जीएसटी दर १२ वरून पाच टक्के झाल्याने सायकलींच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.

वाहनांवर मोठी सूट
१५०० सीसीपर्यंत ः ७० ते ८० हजार रुपये घट
१५०० सीसीवरील ः ४० हजार रुपयांपर्यंत घट
३०० सीसीपर्यंत ः १५ ते २० हजार रुपये घट

जीएसटी कपात झाल्याने मोटारींच्या विक्रीत वाढ झाली आहे. सुमारे दहा लाखांच्या गाडीसाठी सव्वालाख रुपये जीएसटी बसतो. सुमारे दीड लाखांची लाखांची घसघशीत बचत होत आहे. त्यामुळे दसऱ्यासाठी मागणी वाढली आहे. इतक्या गाड्या ग्राहकांना उपलब्ध करून देणे हे सर्व डीलरसाठी आता चॅलेंजिंग बनले आहे.
- संजय गुरम, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा ऑटो व्हिल्स, काळेवाडी

(वृत्तसंकलन ः अमोल शित्रे, राहुल हातोले, अविनाश ढगे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL Live : पाकिस्तानचा विजय अन् श्रीलंकेचे पॅकअप! फायनलमध्ये IND vs PAK होऊ शकते मॅच... ; जाणून घ्या गणित

PAK vs SL Live : पाकिस्तानच्या अब्रार अहमदची 'मस्ती' त्याच्याच अंगलट आली, Wanindu Hasaranga ने बघा कशी लाज काढली Video Viral

Donald Trump: रशियाला निधी पुरवला; युक्रेन युद्धासाठी भारत-चीन जबाबदार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आरोप

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

SCROLL FOR NEXT