सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) चालकांना बस चालवताना मोबाईल, ब्लूटूथ वापरण्यासच नव्हे तर जवळ बाळगण्यासही बंदी आहे. याबाबत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी आदेश जारी केला होता, पण अनेक चालकांनी या आदेशास केराची टोपली दाखविली आहे. परिणामी प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
हा आदेश चार सप्टेंबर रोजी काढण्यात आला होता. त्यामुळे चालकांच्या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीएमपीएमएल पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत सुमारे १,७०० बसच्या माध्यमातून सेवा देते. यातून रोज सुमारे आठ ते १० लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपीएमएलच्या ताफ्यात एक हजारावर खासगी, तर आठशेच्यावर स्वमालकीच्या बस आहेत. या बसवर कर्मचारी असलेले आणि खासगी ठेकेदारांचेही मालकीचे चालक कार्यरत आहेत. सर्रास अनेक चालक मोबाईलवर बोलत बस चालवत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे किरकोळ अपघात होतात.
काही दिवसांपूर्वीच पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या वाहनाला पीएमपीएमएल बसने धडक दिली होती. त्यावेळी चालक मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. चालकांना वाहतूक नियमांचे पालक करण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी देण्याचेही सांगितले होते. यावर देवरे यांनी तत्काळ मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध करून अंमलबजावणीचे निर्देश दिले होते. यानंतरही अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र आहे.
----------
काय आहे नियमावली
- ड्यूटीवर जाण्यापूर्वी चालकाने मोबाईल नियुक्तीवरील वाहक सेवकाकडे जमा करावा
- ड्यूटी संपल्यावर संबंधित वाहकाने चालकाला त्याचा मोबाईल परत द्यावा
- चालक बस चालविताना मोबाईल व ब्लू टूथचा वापर करताना दिसून आल्यास कारवाई करावी
---------
चालकांना मोबाईल वापरास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. चालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगण्याची सूचनाही सर्व आगार व्यवस्थापकांना दिली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्यासही सांगितले आहे.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.