पिंपरी, ता. २६ ः पिंपरी-चिंचवडला ‘हरित शहर’ करण्याच्या उद्देशाने महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांचे दुभाजक आणि पदपथांवर दर दहा मीटर अंतरावर देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्याचा आढावा घेऊन शहरातील रस्त्यांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शुक्रवारी केली.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘हरित शहर’ प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत झाडांच्या संरक्षणासाठी त्यांची नियमित देखभाल करून निगा राखली जात आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याअनुषंगाने अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी ‘क’, ‘फ’, ‘ब’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजक व पदपथांवरील वृक्षारोपणाची पाहणी केली. मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज, सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेंद्र वसावे, उद्यान निरीक्षक दादा गोरड, सहाय्यक उद्यान निरीक्षक ज्ञानोबा कांबळे, उद्यान सहाय्यक प्रदीप गजरमल आदी उपस्थित होते.
अन्यथा ठेकेदारांवर कारवाई
रस्ता दुभाजक व पदपथावरील वृक्षारोपणाचा दर्जा आणि झाडांच्या संख्येबाबत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन वारंवार सूचना देऊनही त्यांचे पालन न करणाऱ्या व कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी दिला. महापालिकेच्या देशी प्रजातींच्या वृक्षारोपण मोहिमेमुळे शहराच्या हरित आच्छादनात वाढ होईल, प्रदूषण नियंत्रणात राहील व पर्यावरणस्नेही शहरनिर्मितीस मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाहणी केलेले भाग
नेहरूनगर, संतोषी माता चौक ते यशवंतनगर चौक, टेल्को रस्ता, स्पाइन रस्ता, दत्तू तात्या चिंचवडे चौक, वाल्हेकरवाडी- ८० फुटी रस्ता, बिर्ला हॉस्पिटल रस्ता, चिंचवड, काळेवाडी बीआरटी रस्ता, कावेरीनगर, कस्पटेवस्ती, वाकड परिसरातील प्रमुख रस्ते.
अधिकाऱ्यांना सूचना
- रस्त्यांच्या दुभाजकांवर झाडे लावताना दोन झाडांच्यामध्ये नियमापेक्षा जास्त अंतर नसावे
- झाडांची छाटणी एका रेषेत करावी
- झाडांभोवती प्लास्टिक वा कचरा दिसणार नाही याची काळजी घ्यावी
- झाडांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बांबूचे संरक्षक कठडे (ट्री गार्ड) लावावे
- झाडांना नियमित पाणी द्यावे
- झाडांमध्ये ‘तन’ राहू नये
- फांद्यांची छाटणी नियोजनबद्ध असावी
शहीद अशोक कामटे उद्यानाला भेट
वाकड परिसरातील शहीद अशोक कामटे उद्यानाला भेट देऊन पाहणी केली. उद्यानातील खुले व्यासपीठ, सुरक्षाव्यवस्था, स्वच्छतागृह आदींबाबत माहिती घेतली. झाडांवर नियमित फवारणी करावी, झाडांना नियमित पाणी द्यावे, उद्यानात आवश्यकतेनुसार आणखी विद्युत दिवे बसविण्यात यावेत, अशा विविध सूचनाही त्यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.