भाष्य
--
‘ईएसआय’ रुग्णालयातून
कामगारांना ‘नवसंजीवनी’?
- अमोल शित्रे
औद्योगिक क्षेत्रात कष्ट करणारा प्रत्येक कामगार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि सुरक्षित पाहिजे, यासाठी कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत (ईएसआयसी) सरकारने मोहननगर येथे कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) रुग्णालय सुरू केले. परंतु, ३० वर्षांपासून रुग्णालय दुर्लक्षित राहिले. ‘सकाळ’ने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. रुग्णालयातील अंतर्गत सुविधा सुधारणांवर भर दिला. रुग्णांना हव्या असणाऱ्या सर्व चाचण्या, शस्त्रक्रिया, निदान आणि उपचार करण्यास सुरुवात केली जात आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील महागड्या उपचारांऐवजी ईएसआय रुग्णालय कामगार रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. मात्र, यात सातत्य असायला हवे. यंत्रसामग्री धूळखात पडू न देता सातत्यपूर्ण कार्यान्वित ठेवून रुग्णांना त्याचा लाभ मिळायला हवा. तरच, मोफत उपचार देण्याचा ईएसआय रुग्णालयाचा उद्देश सफल होईल.
मोहननगर ईएसआय रुग्णालयावर पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी आहे. केवळ पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कष्ट करणारे सुमारे १६ लाख २८ हजार कामगार आहेत. त्यातील केवळ सहा लाख ५० हजार कामगारांची ईएसआय नोंदणी झाली आहे. इतर सात लाख ७८ हजार कामगारांची ईएसआय नोंदणी झालेली नाही. जिल्ह्यातील चाकण, खेड, तळेगाव, लोणावळा, मुळशी औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची संख्याही मोठी आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारही मोठ्या प्रमाणात आहेत. बहुतांश कामगार परप्रांतीय आहेत. कामगार कुठलाही असला तरी त्याच्या आरोग्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ईएसआय रुग्णालयाची आहे. मात्र, त्यात उपचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता असल्यामुळे नोंदणीकृत कामगार असूनही त्यांना खासगी रुग्णालयात लाखो रुपये भरून उपचार घ्यावे लागतात, ही अत्यंत खेदाची बाब आहे. याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर ईएसआय रुग्णालयाने आरोग्य सेवेचा दर्जा वाढविण्यावर भर दिला आहे.
रुग्णालयात दंतरोग चिकित्सक, मूत्रपिंड तज्ज्ञ, ह्रदयरोग तज्ज्ञ यांसह इतर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात नियुक्त झाले आहेत. एमआरआय, डायलिसिस, कॅथलॅब मशिन उपलब्ध आहेत. ऑटो अनालायझर आणि इलेक्ट्रोलाईट अनालायझरही उपलब्ध आहेत. त्यामुळे कामगार रुग्णांना रक्त तपासणीपासून गंभीर शस्त्रक्रियेपर्यंतचे उपचार इथेच मिळणार आहेत. त्यासाठी दहा खाटांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यक्षम केला आहे. दररोज किमान आठ ते नऊ रुग्णांवर उपचार केले जातात. आता ईएसआय रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. रुग्णालयातील यंत्रणा सक्षम केली असली तरी त्याचा फायदा कामगार रुग्णांना झाला पाहिजे.
‘इएसआय’ने काय करावे?
- नवीन सुविधांची माहिती कामगारांना होण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने कंपनीच्या ठिकाणी जाऊन कामगारांचे कॅम्प आयोजित करावे
- कामगारांना रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा, उपचार आणि विविध योजनांची माहिती द्यावी, तरच रुग्णांना लाभ मिळेल
- खासगी रुग्णालयांप्रमाणे रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायला हवी
- केवळ कागदोपत्री कार्यक्षमता वाढवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामगारांना लाभ कसा देता येईल, यावर भर द्यावा, तरच, कामगारांना फायदा होईल