दसरा पुरवणी लेख
...
पानाची ओळख करून देणारे लीड
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोन ऑक्टोबरपासून शताब्दी वर्ष साजरे करत आहे. अगदी गावपातळीपासून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संघाचे कार्य सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरही त्याला अपवाद नाही. शिवाय, शहरानजीक २०१४ मध्ये मारुंजी येथे संघाचे अधिवेशन झाले होते. त्याचे तपपूर्ती वर्ष सुरू होत आहे. या अधिवेशनापासून शहरातील संघाचे काम आणखी अधोरेखित झाले. या कार्याचा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींकडून शताब्दी वर्षानिमित्त ‘सकाळ’ने घेतलेला आढावा...
-------
राष्ट्रहित सर्वप्रथम!
लीड
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे स्वतःसाठी काहीही अपेक्षा न करता समाज आणि राष्ट्रहितासाठी समर्पण हा विचार रुजवणारे, व्यक्तिनिर्माणसाठी झटणारे संघटन. संघाच्या राष्ट्रहित सर्वप्रथम’, या विचाराने प्रेरित होऊन मी संघाशी जोडलो गेलो. शताब्दी वर्षात संघ विचार घरोघरी घेऊन जाताना पंचपरिवर्तनातील स्वच्छता आणि पर्यावरणाच्या विषयावर अधिक काम करण्याचा माझा मानस आहे.
- शंकर जगताप, आमदार, चिंचवड
म हाविद्यालयीन शिक्षण घेताना पुण्यातील नारायण पेठेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जाणे होत असे. त्यावेळी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखांची माहिती झाली. संघ काय आहे? संघाची भूमिका काय आहे? संघ काय काम करतो? याबद्दल अधिक माहिती तेव्हा समजली. आमचे जगताप कुटुंब म्हणजे वारकरी संप्रदायाशी जोडलेले, संपूर्ण शाकाहारी. वारकरी संप्रदायाचा विचार गेल्या पाच पिढ्यांपासून आमच्या घरात आहे. वारकरी संप्रदाय आणि संघ या दोन्हींची विचारसरणी मला सारखीच वाटली. त्यातून मी संघाशी जोडला गेलो.
सामाजिक समरसता
आमच्या पिंपळे गुरवमध्येही संघाची शाखा होती. ऑफिसच्या समोरच त्यांचे कार्य चालायचे. साधारण २००६-०७ या वर्षातील हा प्रसंग आहे. तिथे एक शिक्षक आणि तीन-चार मुले यायचे. शिक्षक प्रशिक्षण द्यायचे, मुलांना शिकवायचे. एकदा मी शिक्षकांना विचारले, ‘‘तुम्ही नक्की काय करता?’’ त्यावेळी त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही समाज सुधारण्यासाठी, व्यक्ती निर्माणासाठी काम करतो. शाखेचे काम प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर मला खात्री पटली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य कोणत्याही एका जाती-धर्मासाठी नाही तर राष्ट्रनिर्माणसाठी आहे. सर्व समावेशक आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे.
स्वयंसेवकांचे निःस्वार्थी योगदान
माझ्या चुलत बहिणीचे सासर बोपोडीचे. तिचे यजमान शिरीष नाईकरे संघाचे स्वयंसेवक. त्यांचे वडीलही संघाचे प्रचारक. त्यांच्या घरातील तिसरी पिढी संघासाठी काम करते आहे. त्यांचे साधे राहणीमान, समाजाप्रती आस्था यामुळे संघाविषयीचे विचार मनात आणखी खोलवर बिंबवले गेले. आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेनंतर मदतीसाठी शिरीष नाईकरे तिकडे गेले होते. ते पंधरा दिवस काम करत होते. त्यावेळी मलाही तिथे जाऊन काम करण्याची संधी मिळाली. संघाचे सर्व स्वयंसेवक पूर्ण ताकदीनिशी, स्वयंस्फूर्तीने काम करत होते. दुर्घटनाग्रस्तांशी कुठलेही नाते नाही, स्वार्थ नाही, अशा स्थितीत केवळ समाजाचे देणे हाच त्यांचा हेतू होता. तसेच जिथे जिथे अशी नैसर्गिक आपत्ती येते, एखादी दुर्घटना घडते, तिथे मदतीसाठी सर्वात आधी संघाचे स्वयंसेवक असतात.
मारुंजी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे अधिवेशन २०१४ मध्ये झाले. राजकीय भूमिका बदलामुळे या अधिवेशनात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने आले होते. अधिवेशनाच्या एक महिना अगोदरपासून काम करत होते. अधिवेशनापूर्वी संघाची समन्वय बैठक रहाटणीमध्ये झाली. त्यात हेमंतजी हरहरे, मिलिंदजी देशपांडे, मुकुंदजी कुलकर्णी, प्रकाशजी मीठभाकरे यांनी मार्गदर्शन केले. त्या बैठकीस मीही उपस्थित होतो. अधिवेशनात संघाची शिस्त अनुभवायला मिळाली. मोठमोठे राजकीय पुढारी, पदाधिकारी
मंचासमोर बसलेले होते. ज्यांच्याकडे जबाबदारी होती, त्याच व्यक्ती केवळ व्यासपीठावर होत्या. तेव्हा लक्षात आले की संघ कुठल्याही पदाला, व्यक्तीला महत्त्व न देता विचाराला, जबाबदारीला महत्त्व देतो.
राष्ट्रहित हे सर्वप्रथम’, या विचाराने मी प्रेरित झालो. शाखेत सहभागी झालो. पण कामाच्या व्यग्रतेमुळे पूर्ण वेळ जाऊ शकलो नाही. मुले मात्र नियमित शाखेला जातात. आमची पिंपळे गुरवची भैरवनाथ शाखा आहे. त्यात मुले जातात. संचलन असेल, शस्त्रपूजन असेल, निधी संकलनाचा विषय असेल, अशावेळी मी जातो. राम मंदिर लोकार्पण वेळी घरोघरी पत्रक व अक्षता वाटप अशा कामात मी सहभाग घेतला आहे.
पंचपरिवर्तन !
संघाने नेहमीच समाज घडविण्याचे काम केले आहे. राष्ट्रहित साधले आहे. भारतीय संस्कृती टिकवली आहे. हिंदूधर्म टिकवणे हा संघाचा उद्देश आहे. परमपूज्य केशवराव हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. त्यानंतर झालेल्या संघचालकांचा हेतू, उद्दिष्ट राष्ट्रहित हेच आहे. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी संघाशी एकनिष्ठ झालो. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेची शताब्दी साजरी केली जात आहे. त्यानिमित्त ‘स्व का बोध’ अर्थात स्वदेशी, नागरिक कर्तव्य, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन असे पाच आयाम निश्चित केले आहे. हा ‘पंचपरिवर्तन’ कार्यक्रम आहे. माझ्या पातळीवर स्वच्छता आणि पर्यावरण यासाठी मी काम करणार आहे.
प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती संघात असावा, असे मला वाटते. संघ स्वयंशिस्त शिकवतो. कमी गरजांमध्ये कसे राहायचे?, आलेले प्रसंग, आपत्ती किंवा दुर्घटनांना कसे सामोरे जायचे? हे संघ शिकवतो. आपल्या देवतांच्या हातांमध्ये शक्तीचे प्रतीक म्हणून शस्त्र असते. त्या पद्धतीने स्वयंसेवकाच्या हातातील काठी ही लढण्यासाठी नसून, शक्तीचे प्रतीक आहे. समाजासाठी एक समर्थ घटक म्हणून तुम्ही उभे आहात, त्यासाठी काहीतरी करू शकता, ही शिकवण त्यात असते. संघाचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत कोणत्याही स्वयंसेवकावर गुन्हा दाखल नाही, त्याने कधी समाज विघातक कृत्य केले नाही, असे दिसते. तसे, माझ्या वाचनात किंवा ऐकिवात आले नाही. संघ म्हणजे व्यक्तिनिर्माणाचे चालते बोलते व्यासपीठच आहे. संघाकडून जी शिकवण मला मिळाली, त्याने प्रेरित होऊन मी पुढील आयुष्य समाजहितासाठी खर्च करणार आहे. कायमस्वरूपी संघासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी काम करत राहणार आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.