पिंपरी, ता. १ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या खेळाडू दत्तक योजनेला मोठी गती मिळाली आहे. २०२२-२३ मधील अर्जांची छाननी करून ४४ पात्र विद्यार्थी-खेळाडूंना ७४ लाख रुपयांचा लाभ देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
‘‘शहरातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून पिंपरी चिंचवडचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. भविष्यात हे खेळाडू नक्कीच शहराचा लौकिक वाढवतील,’’ असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त शेखर सिंह होते. विविध विषयांची माहिती घेत त्यांनी या खर्चास मान्यता दिली. विकासकामांचा विभागनिहाय आढावा घेतला. बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहआयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत व्हिएतनाम येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळवलेल्या प्रगती गायकवाड हिला शिष्यवृत्ती अदा करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच २०२५-२६ ते २०२६-२७ या कालावधीत खेळाडू दत्तक योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना थेट आर्थिक लाभ देण्यासही मंजुरी देण्यात आली. याशिवाय २०२५-२६ या वर्षी शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करून त्यासाठी लागणारा खर्चही मंजूर करण्यात आला. याच बैठकीत ‘घरोघरी तिरंगा २०२५’ उपक्रमासाठी आवश्यक राष्ट्रध्वज खरेदी, कर्णबधिर मुलांसाठी स्पीच थेरपी सेवा सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढ, तसेच पंपहाऊस चालविण्यासाठी तरतूद वर्गीकरणास प्रशासकांची मान्यता घेण्याचा निर्णय झाला. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग १ मधील पाणीपुरवठा कामांमुळे झालेले चर व खड्डे दुरुस्ती, प्रभाग ११, १२, १३ मध्ये धुरीकरणासाठी वाहन भाड्याने घेण्यास मुदतवाढ, निगडी गावठाण परिसरातील स्पाइन रोडचे डांबरीकरण, तसेच मोशी येथील १४ मेगावॅट वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातून निर्मित वीज मनपाच्या आस्थापनांमध्ये वापरण्यासाठी लागणारे शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली.
तसेच ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई व देखभाल दुरुस्तीला मुदतवाढ, प्रभाग १६ किवळेतील डी.पी. रस्ता व शिंदे वस्ती पाइपलाइन रस्ता विकसित करण्यासाठी सल्लागार नेमणूक, तसेच नवी दिशा योजनेअंतर्गत शौचालयांच्या स्वच्छतेच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली. प्रभाग २ कुदळवाडीतील डीपी रस्त्यांचे सुधारित अंदाजपत्रक, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील ४९ गाळे व टॉयलेट ब्लॉक्सची दुरुस्ती, भूमकर चौक-ताथवडे रस्त्यावरील बाधित शौचालये निष्कासित करण्यासही मंजुरी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.