पिंपरी, ता. १ : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतून आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर पालखी मार्ग जातात. आषाढी आणि कार्तिकी वारीशिवाय जवळपास वर्षभर या भागात गजबज असते. पालखी मार्ग तसेच देहू-आळंदी रस्त्याच्या विकासामुळे आळंदीच्या आजूबाजूच्या उपनगरांतील विकासाला चालना मिळाली आहे. या पंचक्रोशीत चऱ्होली आघाडीवर आहे.
तिर्थक्षेत्रे जवळ असल्यामुळे उपनगरांतील विकासालाही चालना मिळाली आहे. वारीच्या काळात या परिसरात दिंड्या मुक्कामी असतात. या पंचक्रोशीतील नागरिकांना संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे दर्शन लाभते. अनेक दिंड्या शहरात मुक्कामी असतात. याशिवाय वारकरी विद्यार्थी मधुकरी घेण्यासाठी येत असतात.
चऱ्होली पंचक्रोशीतील चोविसावाडी, वडमुखवाडी, दिघी, भोसरी, मोशी, डुडुळगाव ही गावे आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर असलेले आळंदी तीर्थक्षेत्र येते. वारकरी शिक्षण घेणारे विद्यार्थी मधुकरी मागण्यासाठी या गावांमध्ये येतात. त्यांनी ठरवून घेतलेल्या घराच्या दारात आल्यानंतर त्यांनी उच्चारलेला ‘मधुकरीऽऽऽ’ असा शब्द संतांनी सांगितलेली नम्रता दर्शवितो. मधुकरी घेतल्यानंतर रामकृष्णहरि म्हणायला ते विसरत नाहीत. त्यामुळे ते ज्यांच्या घरी ते येतात, त्या घरातील गृहिणी असो वा मुले किंवा मधुकरी देणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून रामकृष्णहरि असे हरीनाम घेतले जाते. यातून संस्कार अधोरेखित होतात.
देहू, आळंदीत आलेल्या अनेक दिंड्या शहरातील भाविकांच्या इमारतींमध्ये उतरतात. महाप्रसाद घेऊन ते मार्गस्थ होतात. पूर्वी असे चित्र प्रत्येक गावात, वाड्यावस्त्यांवर बघायला मिळायचे. आता गावांसह वाड्यावस्त्यांचे रूप पालटले आहे. मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. तिथेही संत मांदियाळीच्या निवासाची अन् भोजनाची व्यवस्था भक्तिभावाने केली जाते. ‘साधुसंत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।।’ असाच हा सोहळा असतो.
संतसंग लाभो सदा...
- आषाढी वारीनिमित्त आळंदीहून पंढरपूरला निघालेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा चऱ्होली फाटा, चोविसावाडी, वडमुखवाडी, दिघीतून मार्गस्थ होतो.
- कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरहून आळंदीला जाणारा संत नामदेव महाराज पालखी सोहळा दिघी येथे पिंपरी- चिंचवड शहरात प्रवेश करतो. चऱ्होली फाटा मार्गे आळंदीत प्रवेश करतो.
- संत तुकाराम महाराज वैकुंठगमन दिन अर्थात तुकाराम बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहू येथे आलेला प्रत्येक भाविक आणि दिंड्या आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दर्शनासाठी येतात. त्यांचा मार्ग तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, आळंदी असा असतो.
- पिंपरी-चिंचवडच्या एका बाजूला आळंदी आणि दुसऱ्या बाजूला देहू ही तीर्थक्षेत्रे असून त्यांना जोडणारा देहू-आळंदी रस्ता एक भक्ती मार्गच आहे. शिवाय, वाटेत लागणाऱ्या चिखलीत संत तुकाराम महाराज यांचे टाळ मंदिर आहे.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.