पिंपरी, ता. ४ : छोटे-मोठे कार्यक्रम, लग्न समारंभ, वाढदिवस, नवीन वाहन खरेदी, धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा राजकीय सभा यांत ड्रोन शूटिंगची क्रेझ वाढली आहे. आकाशातून टिपलेले दृश्य कार्यक्रमाला आकर्षक रूप देतात. मात्र, या ग्लॅमरच्या मागे सुरक्षा आणि कायद्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ड्रोन वापरण्यासाठी परवानगी घेण्याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत या वर्षभरात ड्रोन वापरण्यासाठी पोलिसांकडून केवळ ४२ परवानग्या घेण्यात आल्या असून विना परवानगी ड्रोन वापरल्याप्रकरणी पोलिसांत पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
ड्रोन वापरण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. तरीही अनेक ठिकाणी विना परवानगी बिनधास्तपणे ड्रोन वापरले जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः गर्दीच्या भागात किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते. ड्रोन अचानक खाली पडल्यास लोकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ड्रोन उडविण्यासाठी परवागनी आवश्यक आहे. मात्र, छोट्या-मोठ्या कार्यक्रमात ड्रोनचा वापर केला जातो. त्यासाठी आवश्यक असणारी परवानगी घेतली येत नाही.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या संख्येने कार्यक्रम होत असून त्यामध्ये ड्रोनचा वापर असताना या वर्षभरात केवळ ४२ परवानग्या घेण्यात आल्या आहेत. तर विना परवानगी ड्रोन उडविल्याप्रकरणी केवळ पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
या नियमांचे बंधन घालून दिली जाते परवानगी
- ड्रोन कॅमेरा चित्रीकरणामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास, अडथळा निर्माण होणार नाही. तसेच त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
- कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी
- ड्रोन कॅमेऱ्यासाठी वापरण्यात येणारे लॉगइन/ईमेल आयडी, आयपी अॅड्रेस हे ड्रोन चालकाने संबंधित पोलिस ठाण्याकडे द्यावे.
- राष्ट्रीय सुरक्षा संबंधित इमारती तसेच आजूबाजूच्या बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांचे चित्रीकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- ड्रोन कॅमेऱ्याबाबत नागरी विमान सेवा महासंचालनालय यांच्याकडून प्राप्त सूचना/निर्देशांचे पालन करावे.
- केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी मनाई केलेल्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सार्वजनिक ठिकाण, धार्मिक स्थळे, इतर गोपनीय व प्रवेश निषेध ठिकाणांचे चित्रीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी.
- दोनशे फूट उंचीपेक्षा जास्त उंचीवरून आकाशात ड्रोन सोडून चित्रीकरण करू नये.
नियमांकडे दुर्लक्ष
नागरी विमान सेवा महासंचालनालयाने ड्रोन उड्डाणासाठी नियमावली आखली आहे. तसेच स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु शहरात आणि ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी परवानगीशिवाय ड्रोन उडवले जात आहेत. यामुळे सुरक्षेचे धोके वाढले असून, कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.
सुरक्षेचे धोके
- ड्रोन उड्डाण चुकीच्या पद्धतीने झाल्यास त्यातून अनेक धोके निर्माण होऊ शकतात.
- गर्दीत ड्रोन कोसळल्यास अपघात
- बेकायदारित्या शूटिंगमुळे गोपनीयतेचा भंग
- संवेदनशील भागात ड्रोनने शूटींग केल्यास सुरक्षेचा धोका
- गुन्हेगारी वा दहशतवादी कृत्यांसाठी ड्रोनचा गैरवापर
‘‘ड्रोन वापरण्यापूर्वी कायदेशीर परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. विना परवानगी ड्रोन उडविल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाते. मागील काही दिवसांत याप्रकरणी गुन्हेही दाखल झालेले आहेत.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.