पिंपरी, ता. ७ ः सप्टेंबर महिन्यात आणि एकूणच यंदाच्या मोसमात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने या महिन्याच्या सुरवातीपासूनच विश्रांती घेतली आहे. पाऊस थांबताच रस्त्यांवरील खड्ड्यांतून धूळ तसेच धुलिकण हवेत पसरून शहरातील प्रदूषणात भर पडत आहे. यामुळे श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी शहरातील नागरिकांसमोर आरोग्याची समस्या उद््भवली आहे.
खड्डे, विकासकामांमुळे भर
शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. यामध्ये निगडी ते पिंपरी मेट्रो मार्गाची उभारणी, बीआरटी मार्गांवर सुरू असलेले खोदकामे, नव्याने विकसित करण्यात येणारे पदपथ अशा कामांमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात राडारोडा पडतो आहे. तो रस्त्याच्या कडेलाच पडून आहे. त्यावरून किंवा बाजूने जरी वाहने गेली तरी प्रचंड धूळ उडते. याशिवाय मध्यवर्ती भागांसह उपनगरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे महापालिकेकडून बुजविण्यात आलेले नाहीत. पिंपरी, चिंचवड, निगडी, रावेत, आकुर्डी, वाकड, पुनावळे, ताथवडे, चऱ्होली, डुडुळगाव, भोसरी, मोशी, सांगवी, पिंपळे सौदागर अशा सर्वच भागांचा यात समावेश आहे. खड्ड्यामुळे रस्त्यांवरील वाळू, बारीक खडी वर येऊन धुळीत भरच पडते. परिणामी, वाहनचालकांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते.
गृहप्रकल्प, अवजड वाहने
नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरांमध्ये अनेक नवे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहात आहेत. तेथून धूळ व सिमेंट हवेत मिसळते. या प्रकल्पांना कच्चा माल पुरविण्यासाठी उभारण्यात आलेल्या आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) प्लॅंटवर नियमांचे उल्लंघन केले जाते. कच्चा माल पुरविणाऱ्या गाड्यांमधून रस्त्यांवर राडारोडा पडतो. या वाहनांची चाके धुतली जात नाहीत. त्यामुळे रस्त्यावर येणारी माती वाढते. याबाबत कारवाई करण्यास प्रशासनाची उदासीनताही प्रदूषण वाढण्यास कारणीभूत आहे.
रोड वॉशर निरुपयोगी
स्वच्छ हवा कार्यक्रमांर्तगत पिंपरी चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून शहरात ठिकठिकाणी यंत्रणा उभारली आहे. मात्र यातील वायू शुद्धीकरण प्रणाली काही ठिकाणी बंद पडल्याचे आढळून आले आहे. दुसरीकडे रस्ते स्वच्छ करण्यासाठी खरेदी करण्यात आलेले रोड वॉशर शहरातील रस्त्यांवर निरुपयोगी ठरत आहेत. खराब रस्त्यांवर त्याचा करता येत नसल्याने धूळ कमी करण्यात ही यंत्रणा ‘नापास’ ठरत आहे. ट्रक माऊंटेड फॉग कॅनन मधून पडणारे पाण्याचे तुषार काहीच सेकंदांत वाळतात. त्यामुळे प्रदूषण रोखले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
ठोस उपाययोजना कधी?
नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांमध्ये शहरातील प्रदूषण वाढत असल्याचे महापालिकेच्या अहवालातूनच स्पष्ट झाले आहे. शहरात श्वसनाच्या आजार वाढल्याने या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचे याच अहवालातून पुढे आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात विषाणूजन्य आजारांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता वातावरणातील बदल व धूळीमुळेही श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, केवळ यंत्रणा उभारण्याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने कोणतीही ठोस पावले अद्याप उचललेली नाहीत. हिवाळा येण्यापूर्वी महापालिकेने उपाययोजना करावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
---
सध्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही ट्रक माऊंटेड फॉग कॅनॉन , रोड वॉशर यांसारख्या यंत्रणा सुरू केल्या आहेत.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.