जादा परताव्याचे आमिष दाखवून ७१ लाखांची फसवणूक
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून एका व्यक्तीची ७१ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी पीडित व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्ती आणि आठ बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला त्याच्या मोबाईल फोनवर लिंक पाठवली, तसेच वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क केला. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सुरवातीला काही गुंतवणूक करून घेतली. त्याचा खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख आरोपींनी तयार केला. त्यामध्ये फिर्यादीला नफा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे फिर्यादीने अधिक गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना कोणताही नफा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली.
डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
मावळातील मंगरूळ येथे डंपरने तळेगाव एमआयडीसीत रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला धडक दिली. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला.
जितेश राजू सैनी (३०, मावळ. मूळ रा. राजस्थान) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय सतीश मडकर (२७, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद फिरोज आलम (२९, वडगाव मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय यांचा मित्र जितेश सैनी हा त्याच्या दुचाकीवरून जात होता. मंगरूळ येथे पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्याने रस्त्याच्या बाजूला दुचाकी थांबवली आणि पायी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी वेगात आलेल्या डंपरने जितेश याला धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने थेरगाव येथे एका तरुणाला अटक केली.
साहिल विश्वनाथ बारणे (२४, थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह गुरुराज देविदास फंड, श्लोक दीपक सोनार, महादेव चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल किरण जाधव यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीकडून पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले. हे पिस्तूल आरोपीने महादेव चव्हाण याच्या मध्यस्थीने गुरुराज आणि श्लोक या दोघांकडून खरेदी केले होते.
तडीपार गुंडाला शहरात अटक
पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या एका गुंडाला सांगवी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई राजमाता जिजाऊ उद्यानाजवळ पिंपळे गुरव येथे करण्यात आली.
अक्षय दशरथ शिंदे (२३, पिंपळे गुरव) असे आरोपीचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीस पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. तसेच त्याच्याकडे कोयता असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
खूनाचा कट रचणाऱ्या आठ जणांवर गुन्हा
वाघोली येथील एका तरुणाचा खून करण्यासाठी सहा अल्पवयीन मुलांनी पिस्तूल खरेदी केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई औंध हॉस्पिटल मागील मैदान येथे करण्यात आली. सहा अल्पवयीन मुलांसह आर्यन फंड (१९, रांजणगाव, पुणे), गुरू सिंग (२३, मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप गोडांबे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा अल्पवयीन मुलांनी वाघोली येथील रवी ससाणे याचा खून करण्यासाठी आरोपी फंड आणि सिंग
यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे खरेदी केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला.
दारू विक्री करणाऱ्यास अटक
पिंपरीतील लाल टोपीनगर झोपडपट्टी येथे बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी गुंडविरोधी पथकाने एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिनेश साधू सहानी (३८, कुदळवाडी चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विजय गंभिरे यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी त्याच्या चारचाकीत एक लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीची १७५ लिटर गावठी दारू विक्रीसाठी वाहतूक करत असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दारू आणि कार जप्त करत दिनेश याला ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.