पिंपरी,ता. ६ ः गेल्या महिन्यात हिंजवडी माण-रस्त्यावरील पांडवनगर चौकाजवळ सिमेंट मिक्सरने धडक दिल्यामुळे हिंजवडी-माण परिसरातील रस्ते व येथील धोकादायक वाहतूक हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. या भागात ४.५ किलोमीटरचा उड्डाणपूल मंजूर झाला आहे. मात्र, या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याने किमान रस्ते दुरुस्त करण्याची मागणी रहिवासी करत आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील प्रश्न सोडविण्याबाबत राज्यस्तरीय बैठका होऊनही प्रशासकीय विभागांमध्ये समन्वयाचा अभाव कायम असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
अरुंद रस्ते, त्यावरील जीवघेणे खड्डे, अवजड वाहनांची वर्दळ, पदपथांचा अभाव, सकाळी व सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी हे हिंजवडी - माण रस्त्यावरचे नेहमीचेच चित्र. हिंजवडी फेज १ मधून हिंजवडी फेज तीनकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्याने बहुतांश आयटी कर्मचारी या रस्त्याचा वापर करतात. तर दुसरीकडे फेज-१, पांडवनगर भागात मोठ्या प्रमाणावर टाऊनशिप उभ्या राहिल्याने या भागात लोकवस्तीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, अरुंद व खराब रस्त्यांमुळे येथील रहिवासी व आयटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर वाहन चालविणे धोकादायक झाले आहे.
हिंजवडी-माण रस्त्यावर खासगी प्रवासी वाहनांसोबतच, अवजड वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे खराब रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करणे गरजेचे आहे. मात्र, विविध प्रशासकीय विभागांच्या समन्वयाच्या अभावामुळे ही कामे वेगाने होताना दिसत नाहीत. मागे पालकमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्यानंतर या रस्त्यावरील अतिक्रमण काढले आहे. मात्र तो राडारोडा अद्याप तसाच पडून आहे.
- पुष्पराज निंबाळकर, आयटी कर्मचारी व रहिवासी, माण
खराब रस्ते व खड्डे हा या भागातील मुख्य समस्या आहे. कामासाठी बाहेर पडणाऱ्या कर्मचारी, शाळकरी मुले सर्वांनाच याचा त्रास होतो. आतापर्यंत अनेकदा हे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका झाल्या, दौरे झाले मात्र प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नाही.
- प्रशांत भोपळे, सदस्य, पाठकरोड वेल्फेअर असोसिएशन
पांडवनगर चौकातील रस्त्याचे काम दिवाळीपूर्वीच सुरू करण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे हे काम थांबविण्यात आले आहे. रस्त्यावरील पाणी पूर्ण सुकले की पुन्हा हे काम केले जाईल. पांडवनगरच्या पुढील भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो.
- राजेंद्र तोतला, कार्यकारी अभियंता
हिंजवडी आयटी पार्क फेज १ ते फेज ३ या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या कामासाठी हा रस्ता आम्ही एमआयडीसीला सोपावलेला आहे. त्यासाठी पीएमआरडीएने भूसंपादनही केलेले आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीही त्यांच्याकडूनच होणे अपेक्षित आहे.
- संकेत साळुंखे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.