सोमाटणे, ता. ८ ः पाटबंधारे विभागाने कुसगावमधील शेतकऱ्याचे घर अतिक्रमण ठरवून त्यावरून बुलडोझर फिरविला. स्वप्न साकारण्यासाठी नवा बंगला बांधणाऱ्या शेतकऱ्याचे त्यामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे.
कासारसाई धरण बांधण्यासाठी शासनाने पवन मावळातील कुसगावमधील अनेक शेतकऱ्याच्या अतिरिक्त जमिनी संपादित करून सात बारा उताऱ्यावर तसे शिक्के मारले. यात योगेश केदारी यांची गट नंबर २७१ मधील साडेसोळा एकरांपैकी सहा एकर जमीन बाधित झाली. उर्वरित जमीन अतिरिक्त संपादित केली असल्याने ती परत देणे गरजेचे होते, परंतु शासनाने त्यांच्या सर्वच जमिनीवर शिक्का मारला. शिक्का असलेली परंतु शासनाकडून कोणातही मोबदला न घेतलेली जमीन केदारी यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून कसत आहे. याच जमिनीवर त्यांचे पूर्वीचे साधे घर होते. ते जुने झाल्याने त्यांनी ते पाडून शेतीच्या उत्पन्नातून साठवलेल्या पैशातून नव्या बंगल्याचे काम सुरु केले होते. हे काम नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले होते. त्याचवेळी पाटबंधारे विभागाने ते अतिक्रमण ठरवून जमीनदोस्त केले. यात केदारी यांना आर्थिक फटका बसला आहे.
---
धरणासाठी संपादित केलेल्या सर्व जमिनी शासनाच्या मालकीच्या असल्याने नियमानुसार त्यावर कुणालाही बांधकाम करता येत नाही. योगेश केदारी यांनी बांधकाम केलेल्या जमिनीची मालकी पाटबंधारे विभागाची आहे. त्यांचे बांधकाम अतिक्रमण असल्याने सबंधितांना पूर्वकल्पना दिल्यानंतर आम्ही कारवाई केली. पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जमिनीवर कुणी अतिक्रमण केले तर त्यावर तत्काळ कारवाई करावी, असा जलसंपदा विभागाचे आदेश आहे. आम्ही या आदेशाचे पालन करीत कारवाई केली व यापुढेही अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे.
- डी. एम. डुबल, कार्यकारी अभियंता, खडकवासला, पुणे पाटबंधारे विभाग
---
आमच्या साडेसोळा एकरांपैकी सहा एकर जमीन धरणात गेली. उर्वरित संपादित केलेली साडेदहा एकर अतिरिक्त जमीन आम्ही कसतो. ती आमच्या मुळ मालकीची आहे. त्यामुळे तिच्यावरील शिक्का हटवून तिचे आम्हाला हस्तांतरण करणे गरजेचे असताना पाटबंधारे विभागाने आम्हाला बेदखल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ही अतिरिक्त संपादित केलेली जमीन मुळ शेतकरी म्हणून आम्हाला तातडीने द्यावी.
- योगेश केदारी, शेतकरी, कुसगाव
---
फोटो
66260