सकाळ इम्पॅक्ट
पिंपरी, ता. १३ : निगडी-तळवडे रस्त्यावरील गोपीनाथ मुंडे चौकात अस्वच्छ पाणी सोडणाऱ्या खासगी वॉशिंग सेंटरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली. भविष्यात वॉशिंग सेंटरमधून पाणी पुन्हा रस्त्यावर आल्यास कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
याबाबत ‘सकाळ’ने ‘वॉशिंग सेंटरचे पाणी थेट रस्त्यावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. प्रशासनाने संबंधित वॉशिंग सेंटरच्या चालकाला वेळोवेळी नोटीस बजावली आहे. तेथील अस्वच्छ पाणी थेट निगडी-तळवडे रस्त्यावर येत होते. त्यामुळे चौकात पाणी साचून दुचाकींचे अपघातही झाले आहेत. त्यानंतरही संबंधित व्यावसायिकाने उपाययोजना न करता अस्वच्छ पाणी रस्त्यावर सोडणे सुरुच ठेवले. या चौकात बाराही महिने पाणी असायचे. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडतानाही कसरत करावी लागत होती. पदपथावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडत होते. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणीअंती कारवाई केली.
रस्त्यावर अस्वच्छ पाणी सोडणाऱ्या वॉशिंग सेंटरवर दंडात्मक कारवाई केली आहे. असा प्रकार पुन्हा करू नये, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. दंडात्मक कारवाईनंतरही पाणी रस्त्यावर आले, तर वॉशिंग सेंटर थेट सील केले जाईल.
- अतुल पाटील, क्षेत्रीय अधिकारी, ‘फ’ विभाग कार्यालय