पिंपरी, ता. १३ : खासगी कुरिअर कंपनी आणि मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांची दोन कोटी ८० लाखांना फसविले. या टोळीतील सात आरोपींना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी कर्नाटक, तेलंगणा, केरळ या राज्यांसह मुंबईतून अटक केली. यासाठी पोलिसांना तब्बल पाच हजार किलोमीटर प्रवास करावा लागला.
मोहम्मद आमेर अखिल मोहम्मद आरिफ (रा. हैद्राबाद), जिगर जितेश पटेल (रा. मुंबई), अजिथ विजयन (रा. केरळ), सचिन पी. प्रकाश (रा. कर्नाटक), मोहम्मद रिहान मोहम्मद तजमुल (रा. म्हैसूर), सय्यद ओवेझ आफनान सय्यद शौकत (रा. म्हैसूर) आणि त्यांचा एक साथीदार यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी ज्येष्ठ नागरिकांना आरोपींनी व्हॉट्सअॅप आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून स्वतःला एका कुरिअर कंपनीचा कर्मचारी आणि “मुंबई पोलिस अधिकारी” असल्याचे भासवले. ‘‘तुमच्या नावाच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ, लॅपटॉप आणि कागदपत्रे सापडली आहेत; त्यामुळे अटक होऊ शकते’’ अशी भीती दाखविली. तसेच वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचे नाटक करून आरोपींनी फिर्यादींना विविध खात्यांवर मोठ्या रकमा जमा करण्यास भाग पाडले.
प्राथमिक तपासात आरोपींच्या बँक खात्यांमधून ७ कोटी ८६ लाखांहून अधिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तपास करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले.