पिंपरी, ता. १३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाने विविध अभ्यासक्रमांसाठी कायम नोंदणी क्रमांकाची (पीआरएन) लिंक अद्याप खुली केलेली नाही. हे क्रमांक ‘अनब्लॉक’ करण्याचे आश्वासन विद्यापीठाने वारंवार दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याने परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
विद्यार्थ्यांना मर्यादित कालावधीमध्ये परीक्षा देऊन पदवी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. मात्र, दिलेल्या सत्रामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे ‘पीआरएन’ ब्लॉक केले आहेत. पण, या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेचे अर्ज भरता येत नसल्याने विद्यार्थी महाविद्यालय ते विद्यापीठ फेऱ्या मारत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी निवेदन दिली आहे. आंदोलन केली आहेत. विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देता येऊ शकते का? याबाबत महाविद्यालयांनी विचारणा केल्यावर विद्यापीठाने सात नोव्हेंबर रोजी जाहीर प्रकटन देत ‘‘पुढच्या आठवड्यात ‘पीआरएन’ लिंक सुरू होणार असल्याचे सांगितले होते. पण, अजूनही ही लिंक खुली झालेली नाही.
तीन महिन्यांपासून क्रमांक ‘ब्लॉक’
या विद्यार्थ्यांचे ‘पीआरएन’ विद्यापीठाने सप्टेंबरपासून ‘ब्लॉक’ केले आहेत. त्यावर परीक्षेची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यावर विद्यापीठाने तीन वेळा जाहीर प्रकटनाद्नारे विद्यार्थ्यांना फक्त दिलासा दिला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना मर्यादित कालावधीत पदवी पूर्ण करावी लागते. अशांना आता अर्ज भरताना अडचण येत आहे.
सध्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरणे सुरू आहे. त्यानंतर विद्यापीठाने ज्यांचे पीआरएन ब्लॉक केले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लिंक खुली करण्यात येईल.
- सुभाष वाव्हळ, परीक्षा प्रमुख, बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी
विविध महाविद्यालयांतील बरेच विद्यार्थी पदवीच्या तृतीय वर्षाला आहेत, त्यांनी सुरू असलेल्या २०२५-२६ ची असाइनमेंट आणि इंटरनल परीक्षा सुद्धा दिलेली आहे. परंतु त्यांचा पीआरएन नंबर बंद झालेला आहे. त्यामुळे त्यांना महाविद्यालयाकडून आहे. परीक्षा अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची विद्यापीठाने काळजी घ्यावी.
- श्रेयस ब्राह्मणे, विद्यार्थी, दापोडी