पिंपरी, ता. १४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत उद्योगांची वाढ आणि गुंतवणुकीचा वेग पाहता, उद्योजकांच्या अडचणी वेगाने मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र ‘इंडस्ट्रियल सेल’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेलमुळे औद्योगिक प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या विविध मंजुरी प्रक्रियेला गती मिळणार असून उद्योग संघटना, कंपन्या आणि उद्योजकांशी थेट संवादासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
पुणे महानगर प्रदेश हा देशातील प्रमुख औद्योगिक पट्ट्यांपैकी एक मानला जातो. चाकण, नाणेकरवाडी, तळेगाव, पिरंगुट, हिंजवडी-माण, मरकळ, रांजणगाव, सणसवाडी, लोणी काळभोर, सासवड, कुरकुंभ, पाटस तसेच हवेली तालुक्यातील काही भागांमध्ये देशी व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. यामुळे रोजगारनिर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढत असून, उद्योगवृद्धी वेगाने होत आहे. औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध विभागांच्या परवानग्या आवश्यक असतात. त्यापैकी बांधकाम, नकाशे मंजुरी, लेआउट, बदल उपयोग परवानगी आदी प्रक्रिया पीएमआरडीएच्या विकास परवानगी आणि नियोजन विभागाकडून केली जाते. मात्र अनेक उद्योगांना या प्रक्रियेत विलंब, कागदपत्रांची गुंतागुंत आणि विभागांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत होता.
नव्या ‘इंडस्ट्रियल सेल’मुळे उद्योजकांच्या तक्रारी, परवानग्यांचे मार्गदर्शन आणि अडथळे दूर करण्यासाठी एकच केंद्र उपलब्ध होणार आहे. पीएमआरडीएच्या विविध विभागांमधील समन्वय वाढून मंजुरी प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे. परिणामी, औद्योगिक प्रकल्पांना आवश्यक गती मिळून, प्रदेशातील गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती आणखी मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---