पिंपरी, ता. १६ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना गहू तांदळासह आता ज्वारीचेही वाटप सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील स्वस्त धान्य दुकानांत प्रति लाभार्थी एक किलो ज्वारी देण्यास सुरवात झाली. ज्वारीच्या समावेशामुळे लाभार्थ्यांना आरोग्यासाठी उपयुक्त अशा धान्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
ऑक्टोबर महिन्यातील ज्वारीचा साठा डिसेंबरपर्यंत वाटप केला जाणार आहे. या कालावधीत विविध परिमंडळातील गोदामांमध्ये सुमारे पाचशे टन ज्वारी जमा होणार आहे. शिधापत्रिकेवरील सदस्यांना प्रत्येकी दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिले जात होते. ज्वारीचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने आणि खरेदी वाढविण्यात आल्याने वाटपाचे प्रमाण बदलण्यात आले. त्यानुसार एक किलो गहू, एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ देण्यात येणार आहे.
धान्यवाटपात कोणतीही तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आले आहेत. परमीट मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत धान्य उचलणे बंधनकारक असून, तसे न केल्यास संबंधित दुकानदारांचे परमीट रद्द केले जाणार आहे.
धान्याची उपलब्धता, योग्य प्रमाणात वाटप आणि लाभार्थ्यांच्या समाधानासाठी दुकान समन्वय अधिकारी राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार दर महिन्याच्या सात तारखेला ‘अन्न दिवस’ आयोजित करण्यात येईल. ७ ते १५ तारखेदरम्यान ‘अन्न सप्ताह’ असेल. या कालावधीत सर्व स्वस्त धान्य दुकाने १२ तास खुली ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
---
दृष्टिक्षेपात
परिमंडळ : उपलब्ध कोटा
अ : १७२ टन
ज : १४७ टन
फ : १६९ टन
एकूण ः ४८८
-----
शिधापत्रिकेवर ज्वारी मिळू लागली आहे. शासनाने सोय केल्यामुळे इतर ठिकाणी खर्च होणाऱ्या पैशांची बचत होत आहे, फक्त नियमित वाटप होणे अपेक्षित आहे.
- योगेश खुंटे, शिधापत्रिकाधारक
---
ज्वारी वाटपाला सुरवात झाली आहे. दर महिन्याच्या ३० तारखेच्या आत वाटप पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या महिन्यात ज्वारी उशिरा मिळाली. त्यामुळे वाटप अजून सुरू आहे, मात्र आता दर महिन्याला कोटा मिळण्यास सुरवात झाली आहे.
- विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड