पिंपरी, ता. १८ : महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरात तब्बल आठ हजार २२ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. याद्वारे गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या चौकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मार्चअखेर उर्वरित भागांत ७३८ कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. शिवाय, जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या मार्गावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. त्यांचे काम सुरू असून, नवीन सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे वाहतूक नियमांचे पालन, अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर नजर राहणार आहे.
आतापर्यंतचे कॅमेरे
- महापालिकेने पहिल्या टप्यात रेल्वे स्थानके, मुख्य चौक, प्रभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा, उद्याने, बीआरटी मार्ग अशा जवळपास ६४० ठिकाणी दोन हजार ४९० कॅमेरे बसविले
- दुसऱ्या टप्यात ६९० ठिकाणी दोन हजार ५२२ कॅमेरे बसविले
- स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गतही वोक्सारा टेक्नो सोल्यूशन कंपनीच्या सहकार्याने ८९० ठिकाणी तीन हजार १० कॅमेरे बसविले
असे आहेत कॅमेरे
- ‘एएनपीआर आरएलव्हीडी’ प्रकारात मोडणारे अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’
- सीसीटीव्ही कडून ३६० अंशांमधील घडामोडी २४ तास चित्रित होतात
- संपूर्ण प्रणालीवर देखरेखीसाठी निगडीत नियंत्रण कक्ष (कमांड कंट्रोल सेंटर) कार्यान्वित
- सीसीसी कक्षातून कॅमेरांद्वारे अपघात, आक्षेपार्ह गोष्टींवर करडी नजर
तीन महिन्यांत ७३८ कॅमेरे बसविणार
महापालिकेकडून २,९६० कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत २,५२२ कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित ४३८ कॅमेरे जानेवारी अखेरपर्यंत बसवून एक एप्रिल २०२६ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ३,३१० कॅमेरे बसविण्याचे नियोजन असून, ७२० ठिकाणी ३,०१० बसविले आहेत. उर्वरित ३०० कॅमेरे फेब्रुवारी अखेरपर्यंत बसविण्याचे नियोजन आहे.
कॅमेरांची पोलिसांना मदत
शहरात विविध ठिकाणी झालेले अपघात व विविध आक्षेपार्ह घटना कॅमेरात झालेल्या चित्रीकरणामुळे उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनाही याची मदत होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी विविध तक्रारी निकाली काढण्यास मदत झाली आहे. शहरात बांधकामे, रस्त्यांचे जाळे विस्तारते आहे. लोकसंख्याही झपाट्याने वाढते आहे. नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त जीवन जगता यावे म्हणून महापालिकेकडून शहराच्या कानाकोपऱ्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
आता ऑनलाइन चलन
शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, अपघातांची संख्या वाढली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बहुतांश वेळा अपघात झाल्याचे उघड झाले आहे. भरधाव वेगाने, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, चौकातच वाहन पार्किंग करणे अशा विविध नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत १२१ चौकात बसविलेल्या कॅमेरांद्वारे आता वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवर ई-चलनाद्वारे दंड ठोठावला जाणार आहे. यासाठी सॉफ्टवेअर बनविण्याचे काम सुरू असून, लवकरच प्रायोगिक तत्त्वावर काही रस्त्यांवर अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारी घटनांचा तपास करणे सोपे झाले आहे. अपघातातील दोषींची माहिती उघड होते. उर्वरित सीसीटीव्ही देखील आगामी दोन महिन्यांत बसविण्यात येणार आहेत.
- अनिल भालसाखळे, सहशहर अभियंता, महापालिका
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत तीन हजारांहून अधिक कॅमेरे बसवून झाले आहेत. बीआरटीएस मार्गांवरील कॅमेऱ्याच्या केबल चोरी होत असल्यामुळे त्या ठिकाणी कॅमेरे बसविणे बाकी आहे. या सर्व सीसीटीव्हीमुळे नागरिकांची सुरक्षा वाढली आहे.
- कन्हान विजय, महाव्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी, स्मार्ट सिटी
PNE25V68910