सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ ः कार्यालयात पोचण्यास काही मिनिटांनी उशीर, महिन्यातून किमान १०-१२ ‘लेटमार्क’, परिणामी होणारी वेतन कपात, त्यातून सोसावे लागणारे आर्थिक नुकसान....अशा नानाविध समस्यांचे एकमेव कारण म्हणजे वाहतूक कोंडी...मात्र त्यावर प्रशासनाच्या उपाययोजना कमी पडत असल्याने नागरिकांनीच उपाय शोधला आहे. याचा एक भाग म्हणून अनेक जण कंपनीपासून जवळच्या परिसरात घर विकत घेत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची उग्र रूप धारण करीत आहे. पावसाळ्यात याची तीव्रता कित्येक पटींनी वाढते. तासन््तास कोंडीत अडकून पडणे म्हणजे दिनक्रमाचा अटळ भागच बनले आहे. यामुळे काही जण शहरातून एमआयडीसी परिसरात, तर काहीजण ग्रामीण भागातून शहरात स्थलांतर करत आहेत.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरीजवळ भोसरी आणि चाकण येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) क्षेत्र विकसित झाले आहे. रोजगारानिमित्त देशातील अनेक भागांतील लोक इथे स्थायिक झाले आहेत. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्याही वाढत आहे. अनेकांनी सह्याद्रीच्या डोंगररांगेच्या कुशीत वसलेल्या मावळ आणि परिसरात घरे घेऊन तेथेच राहण्यास पसंती दिली आहे. यातील अनेकांना रोज कामासाठी पिंपरीच नव्हे तर अगदी पुण्यापर्यंत जावे लागते. अनेकांना कामासाठी चाकण, भोसरी एमआयडीसीत जावे लागते.
शहर आणि परिसरात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) बस सेवा दिली जाते. पण, सार्वजनिक वाहतूक सेवेचे ढिसाळ नियोजन आणि अपुऱ्या बस त्यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडत आहे. सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी पाच ते आठ या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. कोंडीमुळे जाता-येता दिवसातील तीन ते चार तास प्रवासातच जात असल्याने अनेकांनी अखेरीस कंपनीजवळच घर घेऊन राहण्याचा पर्याय निवडला.
--------------
काही कंपन्यांची दुचाकीवर बंधने
चाकण परिसरात काही दिवसांपूर्वी दुचाकी घसरून कंटेनर खाली आल्याने मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. त्यानंतर आठच दिवसात झालेल्या दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वाराचा एक पाय निकामी झाला होता. खड्डे आणि निसरड्या रस्त्यामुळे अपघात वाढले आहे. वाढते अपघात लक्षात घेता काही कंपन्यांनी दुचाकी घेऊन येण्यास बंदी घातली असून त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करून दिली आहे.
------------
चाकण परिसरात राहायला असून कामानिमित्त मी दररोज चिंचवडमध्ये येते. गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दिवसातील तीन-तीन तास प्रवासात जात आहेत. त्यात कामावर पोचायला दररोज लेट होत आहे. त्यामुळे आता आम्ही शहरात राहायला येण्याचा निर्णय घेतला आहे.
- सुनंदा सातपुते, महिला कर्मचारी
---
वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. दररोज किमान चार ते पाच तास प्रवासात जात आहेत. मी पूर्वी भोसरी येथे राहायला होतो. आता चाकण येथे राहायला आलो आहे. तरीही आता पण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.
- संदीप हरणे, कर्मचारी
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.