पिंपरी, ता. १० : निगडी ते तळवडे रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत विविध अपघातांत चौघांचा मृत्यू झाला. जखमींची तर मोजदादच नाही. तर, एकट्या तळवडे भागात आतापर्यंत तिघांनी आपला जीव गमावला आहे. परिसरातील खड्डे, दुभाजकांची तोडफोड, अवजड वाहनांच्या बेशिस्त चालकांमुळे यातील बहुतांश अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी (ता.९) तळवडे येथे पीएमपी बसने दोन बहिणींना चिरडल्याच्या घटनेनंतर या घटनांचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
कधी खड्डा चुकवताना, तर कधी रस्त्यावरील अस्ताव्यस्त राडारोड्यामुळे दुचाकी घसरून, कधी चुकीच्या पद्धतीने बसवलेल्या गतिरोधकाममुळे नियंत्रण सुटल्याने शहरात कित्येकांचे सर्रास बळी जात आहे. यातून जीव वाचलाच, तर पायी जाताना कधी आणि कोणता डंपर, मिक्सर, ट्रक, पीएमपी बस अंगावर कोसळून चेंदामेंदा करेल याचाही नेम नाही. अपघात होतात बळी जातात, पोलिस दप्तरी कधी अपघाती मृत्यूची नोंद होते, मात्र ‘यम’सदनाची वाट दाखवणारे रस्त्याची परिस्थिती बदलणार कधी? शहरात अपघातात अनेकांचे बळी गेला असताना वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे? असे प्रश्न जीव मुठीत घेतलेले पादचारी आणि वाहन चालकांना पडला आहे.
- अपघातांची कारणे
तळवडे ते निगडी रस्त्यावर अनेक ठिकाणी दुभाजक तोडलेले
नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या ठिकाणी पांढरे पट्टे नाहीत
मधोमध असलेल्या झाडांची पुरेशी छाटणी न झाल्यामुळे रस्ता ओलांडताना वाहने दिसत नाही
काही ठिकाणी अतिक्रमणे हटविल; मात्र रस्ता रुंदीकरण झालेच नाही
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे अनधिकृत पार्किंग
अवजड वाहनांसाठी नियमावली असूनही पालन होत नाही
- नागरिकांना अपेक्षित उपाययोजना
निगडी ते तळवडे रस्ता रुंदणीकरण
अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई
रस्त्यांवरील आणि लगतची अतिक्रमण काढणे
रस्ते ओलांडण्यासाठी पांढरे पट्टे आवश्यक
दुभाजक सुरू होण्यापूर्वी गतिरोधक असावा
दिवस, अपघात आणि मृताचे नाव
- १७ जून २०२३ - तळवडे कॅनबे चौकाकडून महिंद्रा कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या बांधकाम कामगार भीमशाप्पा बंगारम (वय ४१) व्यक्तीचा मृत्यू
- १२ डिसेंबर २०२३ रोजी त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्यावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार नवनाथ भानुदास गायकवाड (वय ४०) यांचा मृत्यू
- २५ फेब्रुवारी २०२४: महाळुंगे-तळवडे रोडवर महाळुंगे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार हनुमान तिरथ आय्यान यांचा मृत्यू
- ३१ डिसेंबर २०२४ - ज्योतिबानगर, तळवडे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार श्रेयश अशोक परंडवाल (वय २८) यांचा मृत्यू
- १३ ऑगस्ट २०२५ - तळवडेतील कॅनबे चौकाजवळ रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार श्याम रंगनाथ राठोड (वय १९, चिंचवड) याचा मृत्यू
- १४ सप्टेंबर २०२५ - तळवडे टॉवर लाइन परिसरातून पायी जाणाऱ्या संध्या माधव मडिवाल (वय ४९, रा. लातूर) यांचा मोटारसायकलच्या धडकेत मृत्यू
- १९ नोव्हेंबर २०२५ : तळवडे उत्कर्ष चौकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत लाकूड घेऊन जाणाऱ्या व्यंकटेश पवार (३५) यांचा मृत्यू
तळवडे ते निगडी रस्त्याच्या कामाचा कार्यादेश काढला आहे. पण, काही ठिकाणी जमीन अधिग्रहणाला काही जणांचा विरोध आहे. ते न्यायालयात गेले आहेत. या जागा सोडून इतर ठिकाणी रस्ता दुरुस्तीसह इतर कामे लवकर करण्याच्या सूचना संबंधितांना देणार आहोत.
- मकरंद निकम, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
निगडी ते तळवडे रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. ते रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून करत आहोत. पण, पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस हे दोघेही अपघात गाभीर्यांने घेताना दिसताना दिसून येत नाहीत.
- विठ्ठल पारेख, स्थानिक नागरिक, तळवडे
PNE25V75228
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.