सुसगावमध्ये जुन्या वादातून
एका तरुणावर शस्त्राने वार
पिंपरी ः सुमारे महिनाभरापूर्वी शर्यतीचा बैल पळविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मंगळवारी (ता. १६) दुपारी साडेतीनच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सुसगावमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी सिद्धांत कैलास मानमोडे (वय २०, रा. सुसगाव) यांनी तक्रार दिली. त्यावरून बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रणव काशिनाथ वाघमारे ऊर्फ चिव्ह्या (वय १९, रा. सुतारवाडी, पाषाण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे साथीदार क्षीरसागर व आणखी एक अनोळखी व्यक्ती सध्या फरार आहेत. आरोपींनी महिनाभरापूर्वी झालेल्या शिवीगाळीचा बदला घेण्यासाठी मानमोडे यांना पुन्हा शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर व शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
-------
परस्पर गहाण ठेवलेली मोटार
सोडविण्यासाठी खंडणीची मागणी
पिंपरी, ता. १७ ः भाड्याने घेतलेली मोटार परस्पर एका व्यक्तीकडे गहाण ठेवल्याचा आणि मालकाने मोटार परत मागितली असता त्याच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार चिखलीत चार नोव्हेंबरला घडला. याप्रकरणी नीलेश भाऊराय नागरिक (वय ३६, रा. शिवतेजनगर, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विनोद शंकर पवार (रा. काळेवाडी) व आदेश कोंडरे (रा. माऊली नगर, कोंडरे वस्ती, कामशेत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पवारने नागरिक यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील मोटार भाड्याने घेतली. त्याने ठरलेल्या वेळेत मोटार परत केली नाही. नागरिक यांनी जीपीएसच्या साहाय्याने मोटारीचे लोकेशन तपासले. मोटार कोंडरेकडे असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी तेथे जाऊन मोटार परत मागितली. त्यावेळी एक लाख रुपये दिले तरच मोटार परत देतो, असे त्यांना सांगण्यात आले.
---------
आंबी येथे हातभट्टीवर कारवाई
पिंपरी, ता. १७ ः तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (ता. १६) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास आंबी येथे हातभट्टीवर कारवाई करून दोन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस शिपाई रमेश सोमीनाथ घुले (वय २७) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महिला आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला. गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना ओढ्याच्या बाजूला असलेल्या कंजारभाट वस्ती परिसरात छापा टाकला. दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे गूळमिश्रित कच्चे रसायन तेथील एका लोखंडी टाकीत साठवले होते. पाच हजार लिटर क्षमतेच्या टाकीत अंदाजे चार हजार लिटर रसायन आढळले.
--------
मोटारीच्या धडकेत तरुण जखमी
पिंपरी, ता. १७ ः भरधाव मोटारीच्या धडकेत मंगळवारी (ता. १६) पहाटे साडेतीनच्या सुमारास बावधन येथील चांदणी चौकातील रस्त्यावर एक तरुण गंभीर जखमी झाला. प्रसाद दिलीप मिसाळ असे जखमीचे नाव आहे. ते स्वीगीची ऑर्डर घेण्यासाठी दुचाकीवर थांबले होते. याप्रकरणी ओमकार राम हटकर (वय २४, रा. शिवदर्शन, पर्वती, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मिसाळ हे त्यांचे आत्येभाऊ आहेत. पोलिसांनी तेजस बाबूलाल चौधरी (वय ३२, रा. फ्लॅट नं. ५०८/५, पेबल्स वन, ए विंग, बावधन) याच्यावर गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात मोटार चालकाने मादक पदार्थांचे सेवन केल्याचे पोलिसांनी आढळले.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.