पिंपरी-चिंचवड

आरएमसी प्लांटमुळे ताथवडे, पुनावळेला प्रदूषणाचा विळखा

CD

पिंपरी, ता. १९ ः ताथवडे, पुनावळे, वाकड आणि रावेत परिसरात लोकवस्तीच्या मध्यभागी सुरू असलेल्या रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्लांटमधून सातत्याने उडणारी धूळ, सिमेंटचे सूक्ष्म कण आणि वाहनांची वर्दळ यामुळे संपूर्ण परिसरात प्रदूषणात मोठी भर पडत आहे. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे, पुनावळे, वाकड आणि रावेत भागात मोठ-मोठे बांधकाम प्रकल्प विकसित होत आहेत. त्यासाठी लागणारे आरएमसी प्लांट मुळात लोकवस्तीच्या बाहेर, औद्योगिक किंवा नियोजित क्षेत्रात असणे अपेक्षित असते. मात्र, हे प्लांट येथील रहिवासी भागात सुरू आहेत. ते चालवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून पर्यावरण नियम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निकष आणि महापालिकेच्या अटी धुडकावून लावल्या जात आहेत. धूळ नियंत्रणासाठी आवश्यक पाण्याची फवारणी, बंदिस्त यंत्रणा, हरित पट्टा यांसारख्या उपाययोजना केल्या जात नाहीत.

महापालिकेची उदासीन भूमिका
नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तक्रारी केल्यानंतर काही दिवस किरकोळ उपाययोजना केल्या जातात. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. महापालिकेची ही उदासीन भूमिका बांधकाम व्यावसायिकांना पाठीशी घालणारी असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

कारवाईची मागणी
या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग, खोकला, दमा यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिक सांगतात. शाळकरी मुलांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. आरएमसी प्लांट तातडीने लोकवस्तीबाहेर हलवावेत, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि प्रदूषण नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

--------

आमच्या इमारतीजवळ आरएमसी प्लांट सुरू असल्यापासून घरात बसणेही कठीण झाले आहे. सतत सिमेंटची धूळ घरात येते, खिडक्या बंद ठेवल्या तरी फरक पडत नाही. लहान मुलांना खोकला, सर्दीचा त्रास वाढला आहे. महापालिकेकडे अनेकदा तक्रार केली, पण ठोस कारवाई होत नाही. नियम मोडणाऱ्या प्लांटवर तातडीने बंदी घालावी.
- अनिल पाटील, रहिवासी, ताथवडे
-----------

आमच्या लोकवस्ती भागात नवीन बांधकाम प्रकल्पाच्या शेजारी आरएमसी प्लांट सुरू असल्याने धूळ, प्रचंड आवाज आणि वाहनांच्या सततच्या वर्दळीचा त्रास होत आहे. जड वाहने अरुंद रस्त्यांमधून ये-जा करत असल्याने धुळीचा असह्य त्रास सहन करावा लागतो. या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून मुलांना शाळेत पाठवताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी.
- सुजाता देशमुख, रहिवासी, रावेत

---------

लोकवस्ती भागात सुरू असलेल्या ११ आरएमसी प्लांटवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षात अशा कारवाईचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे असले तरी आरएमसी प्लांट उभारताना सर्व नियम व अटींचे पालन करण्याबाबत महापालिकेने प्रत्येक बांधकाम

व्यावसायिकाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. लोकवस्ती परिसरात नियमबाह्य आरएमसी प्लांट आढळल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावून ते तातडीने बंद करण्याची कारवाई केली जाईल.
-संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT