पिंपरी, ता. २७ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा फलदायी ठरत नसल्याने आता महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्ष सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्रपक्षांशी चर्चा होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र येऊन जागावाटप करून लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मविआच्या घटक पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यासाठी सकारात्मक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आल्यानंतर या पक्षाचे स्थानिक नेते अजित गव्हाणे, ॲड. चाबुकस्वार, चिखले, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे व प्रदेश सरचिटणीस बाबू नायर यांच्यात चर्चा झाली. शिवसेना उबाठाने राष्ट्रवादीकडे ३६, तर मनसेने २० जागांची मागणी केली होती. मविआने ६८ जागांची मागणी केली होती. मात्र; यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने किती मागितल्या होत्या याचे चित्र स्पष्ट झाले नव्हते.
दोन्ही राष्ट्रवादींची आघाडीबाबत गेले दोन दिवस चर्चा सुरु होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर शुक्रवारी व शनिवारी पिंपरी चिंचवडचे प्रभारी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चर्चा केली. आघाडीबाबत शनिवारपर्यंत घोषणा होणार होती. परंतु; राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला घड्याळ चिन्हावर लढण्याची अट घातल्यामुळे आघाडीची चर्चा फिसकटल्याचा खात्रीशीर वृत्त आहे. त्यानंतर डॉ. कोल्हे यांनी काँग्रेसचे साठे यांच्याशी चर्चा केली ‘आपण लवकरच बैठक घेऊन जागावाटपाबाबत ठरवू,’ असे त्यांनी सांगितले. तर; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनीही साठे यांच्याशी चर्चा करून ‘आपण बैठक घेऊन चर्चा करू,’ असे सांगितले.
मविआमधील मित्र पक्ष शिवसेना उबाठा व काँग्रेसची शनिवारी ताथवडेतील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. यावेळी शिवसेना उबाठाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, ॲड. चाबुकस्वार व काँग्रेसचे साठे, नायर यांच्यात चर्चा झाली. जागा वाटपावर चर्चा होऊन कोणाला किती जागा मिळतात व कशा प्रकारे एकमेकांना सामावून घेतले जाते, यावरच मविआचा मेळ बसणार आहे. मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संसदीय समितीच्या गुरुवारी (ता. २५) झालेल्या बैठकीत महापालिका जातीयवादी भाजपबरोबर जाणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची नाही, असा निर्णय झाला. काँग्रेस, मनसेबरोबर आम्ही आघाडी करणार नाही. शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील जागा दिल्यास आमची हरकत नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे साठे यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता जागा वाटपात या पक्षांना समाधानकारक जागा मिळतात का, यावरही आघाडीचे गणित ठरणार आहे.
---
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आला होता. परंतु; महाविकास आघाडी त्यांच्याबरेबर जाणार नाही. आघाडीतील मित्र पक्षांमध्ये चर्चा सुरु असून लवकरच जागावाटपाचा निर्णय होईल.
- ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
---
राष्ट्रवादी काँग्रेसकडे महाविकास आघाडीसाठी ६८ जागांची मागणी केली होती. परंतु; पक्षाने महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडतील सर्व मित्रपक्ष एकत्र लढणार असून बैठक घेऊन आपसांत जागा वाटून घेणार आहेत.
- तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पिंपरी चिंचवड
---
महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर न जाता एकत्र येऊन लढायला तयार आहेत. घटक पक्षांशी वरिष्ठ नेत्यांची सविस्तर चर्चा होईल. त्यानंतर सर्वानुमते जागावाटप होईल.
- पृथ्वीराज साठे, सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संसदीय समिती
---
राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात बोलणी सुरु असून महाविकास आघाडीच्या घटक पक्षाशीही स्थानिक नेते बोलले आहेत. आघाडी होईल, असे अपेक्षित आहे. अद्याप निर्णय झालेला नाही. आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार अंतिम निर्णय घेतील.
- योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पिंपरी चिंचवड
---
महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्र लढण्याबाबत स्थानिक नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. अद्याप जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. समाधानकारक जागा मिळाल्यास मनसेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.
- सचिन चिखले, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी चिंचवड
....