पिंपरी-चिंचवड

विठाई सात बोकील

CD

आध्यात्मिक लोकशाहीचे रचयिते ज्ञानदेव

उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे यांचा अधिकार त्याकाळी केवळ सवर्ण पुरुषांना होता. स्त्रिया आणि शुद्र त्यापासून वंचित होते. गीता वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार त्यांना होता, पण ती संस्कृतात. यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात या अधिकाराचा काहीच उपयोग नव्हता. ज्ञानदेवांनी ती मराठीत आणून स्त्री-शूद्रांना त्यांचा हा अधिकार प्रत्यक्षात मिळवून दिला. तेराव्या शतकात त्यांनी केलेली ही फार मोठी क्रांती होती.
- डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

‘ज्ञानदेवे रचिला पाया।’ असे संत बहिणाबाई म्हणून गेल्या आहेत. हा पाया कोणता? तर भागवत संप्रदायाचा. भागवत संप्रदाय हा वारकऱ्यांचा संप्रदाय. दरवर्षी पंढरीची वारी करतो तो वारकरी. कपाळी त्रिपुंड लावून, गळ्यात तुळशीची माळ घालून मुखाने ‘रामकृष्णहरि’ हा मंत्र जपतो तो वारकरी. का बरे असे म्हटले गेले की ज्ञानदेवांनी या संप्रदायाचा पाया घातला तर कोणत्याही धार्मिक संप्रदायाला एक दैवत, एक प्रमाणग्रंथ आवश्यक असतो.
द्वारकेचे केणे आले याचि ठाया।
पुढे भक्त राया चोजवीत ।।
प्रत्यक्ष श्रीकृष्ण द्वारकेहून विठ्ठलाच्या रुपात पंढरपुरी आल्याची श्रद्धा मराठी लोकांत आहे. तेव्हा पंढरीचा विठ्ठल हे दैवत या संप्रदायात होतेच. स्वतंत्र आणि स्वायत्त अशा धर्मसंप्रदायाची प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी लोकधर्माच्या पातळीवरून धर्मसंप्रदायाच्या पातळीचा दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रमाणग्रंथाची आवश्यकता असते. तो ग्रंथ ज्ञानेश्वरांनी दिला. म्हणून त्यांनी पाया रचिला, असं संत बहिणाबाई म्हणतात. ‘ज्ञानेश्वरी’च्या रुपाने वारकरी संप्रदायाला एक प्रमाणग्रंथ लाभला. आपल्याकडे उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि गीता ही प्रस्थानत्रयी मानली गेली आहे. पण ही सारी संस्कृतात. ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदायाने आपला प्रमाणग्रंथ म्हणून स्वीकारली. संप्रदायाला तात्विक आधार मिळाला. बैठक मिळाली.
ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाला ही प्रतिष्ठा मिळवून दिली आणि त्याचबरोबर मराठी भाषेत म्हणजे बहुजनांच्या भाषेत ग्रंथरचना करून, गीतेतील सारसर्वस्व त्यांच्या हाती सोपविण्याची मोलाची कामगिरी केली. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि गीता यांपैकी भाष्य करण्यासाठी त्यांनी गीतेची निवड केली यामागेदेखील सामाजिक उत्थानाची प्रेरणा दिसून येते. उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे यांचा अधिकार त्याकाळी केवळ सवर्ण पुरुषांना होता. स्त्रिया आणि शुद्र त्यापासून वंचित होते. गीता वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार त्यांना होता, पण ती संस्कृतात. यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात या अधिकाराचा काहीच उपयोग नव्हता. ज्ञानदेवांनी ती मराठीत आणून स्त्री-शूद्रांना त्यांचा हा अधिकार प्रत्यक्षात मिळवून दिला. तेराव्या शतकात त्यांनी केलेली ही फार मोठी क्रांती होती.
वारकरी संप्रदायांत ज्ञानदेवांच्या छत्राखाली जो संतमेळा जमला त्यात अठरापगड जाती होत्या. ‘भेदाभेद अमंगळ’ मानून सारेच वारीमध्ये सहभागी होऊ शकले. त्या काळात असंख्य ग्रामदेवतांचा सुळसुळात झाला होता. अज्ञानी आणि दरिद्री लोकांना पिळून काढणाऱ्या भोंदूंचा बुजबुजाट झाला होता. ‘श्रीविठ्ठल’ या एकाच दैवताला मानणारा हा संप्रदाय त्यांना दिलासा देणारा ठरला. बहुदेवतावाद नियंत्रित झाला. कर्मकांडापेक्षा भक्तीमार्गाचा पुरस्कार केल्यामुळे आचारात सुटसुटीतपणा आला. ‘न लागे सायास जावे वनांतरा’... सामाजिकदृष्ट्या हे मोठे परिवर्तन होते. अध्यात्मिकदृष्ट्या पोरक्या असलेल्या बहुजनांना त्यामुळे मोठाच दिलासा लाभला म्हणून तर पुरुष असूनही ज्ञानदेवांना ‘माउली’ म्हटले जाते.
वारी एकट्याने करायची नसून समूहाने करायची असते. आषाढीला महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून वारकऱ्यांचे अनेक समूह पंढरपूरच्या दिशेने निघतात. सारे वारकरी जातीभेद विसरून विठ्ठलाच्या नावाचा घोष करीत, विविध संतांच्या रचना गात, नाचत भक्तिरसात नाहून निघतात. आषाढी वारीचे वेळापत्रक देखील बहुजन शेतकऱ्यांच्या सोईचे, लवचिक असे बनवले गेले आहे. कारण वारकरी हा संप्रदाय हा विरक्त संन्याशांचा नसून गृहस्थाश्रमींचा संप्रदाय आहे. त्यामध्ये स्त्रियादेखील सहभागी होऊ शकतात.
वारीच्या सांगतेला चंद्रभागेच्या वाळवंटात सारे वारकरी काला करतात. म्हणजे समाप्तीचे कीर्तन झाले की दहीहंडी फोडून त्यातील काल्याचा प्रसाद सारे एकमेकांना भरवतात.
‘वर्ण अभिमान विसरली याती ।
एकएकां लोटांगणी जाती ।।
असं संत तुकोबारायांनी ज्याचे वर्णन केले आहे, तो सोहळा असा आध्यात्मिक लोकशाही निर्माण झाल्याचा पुरावा आहे. ‘एकमेका पायी लागती।’ मधून समतेचा पुरस्कार केलेला दिसतो. वारीमुळे जाती संघटनेची कर्मठ दृढता सैल झाली, हा मोठाच बदल होता.
वारकरी संप्रदायाने सर्वांना केवळ सामावून घेतले नाही, तर त्यांना लिहिण्याची प्रेरणा दिली. ज्ञानदेवकालीन साहित्य मौखिक स्वरुपात अधिक होते. बोलून, गाऊन, वाचून ते दाखवले जाई. ज्यांना लिहिणे-वाचणे अवगत नव्हते. त्यांनाही केवळ श्रवणाने त्यात सहभागी होता येई. ग्रंथप्रामाण्य मानण्यापेक्षा अनुभव प्रामाण्य मानून त्याची कास धरण्याची प्रेरणा त्यांनी सामान्यांना दिली. ज्ञानदेवांच्यामुळे जो आत्मविश्वास निर्माण झाला, त्यामुळे अनेक जण कविता रचू लागले. काही संतांची पूर्ण कुटुंबे रचना करत होती, हा चमत्कार त्यामुळे घडला. ज्ञानदेव आणि त्यांची निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही भावंडे, संत नामदेव यांचे पंधरा-सोळा जणांचे पूर्ण कुटुंब- अगदी जनाबाई या त्या कुटुंबातील दासीपर्यंत सारेजण- चोखा मेळा यांचे कुटुंब या साऱ्या मंडळींनी अभंग रचना केली. चोखोबांच्या कविता लिहून घ्यायला अनंत भट अभ्यंग नावाचा एक ब्राह्मण पुढे आला, हे सामाजिक अभिसरण फार मोलाचे आहे.
ज्ञानेश्वरी मराठमोळ्या लोकछंदात म्हणजे ओवी छंदात लिहिली आहे, हीदेखील सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे. त्या पूर्वी साहित्यरचना संस्कृत वृत्तांत केली जाई. तेच प्रतिष्ठेचे मानले जाई. ज्ञानदेवांनी ओवी हा छंद अत्यंत सामर्थ्याने उपयोगात आणला. नंतरच्या एकोणिसाव्या शतकातील रामचंद्रपंत बडवे यांनी ‘ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची’ असं म्हणून त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव केलेला दिसतो.
ज्ञानदेवांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिच्यात रचना केली. आणि ओवी या सर्वसामान्य लोकांच्या तोंडी सहज असणाऱ्या छंदात रचना करून आपल्या मराठी भाषेला प्रतिष्ठा दिली. लोकसंवाद त्यांना महत्त्वाचा वाटत होता. याच आपल्या भाषेत ‘ब्रह्मविद्येचा सुकाळू’ निर्माण करण्याची खात्री त्यांना होती.
परकीय आक्रमणांच्या त्या राजकीयदृष्ट्या अंधाधुंद काळात त्यांनी आपली भाषा जपली. आपल्या भाषेत रचना करण्याचा आत्मविश्वास लोकांना दिला. जातीभेदावर मात करता येते, हे सोदाहरण पटवून दिले. त्याला कृतीची जोड दिली.
मार्गाधारे वर्तावे। विश्व हे मोहरे लावावे।।
हे आपले ब्रीद आपल्या हयातीत साकार होऊ लागलेले त्यांनी पाहिले. समाजसुधारक संत ज्ञानदेव, आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना करणारे संत ज्ञानदेव ही त्यांची रुपेही मोलाची आहेत, म्हणूनच आध्यात्मिक लोकशाहीचे रचयिते ज्ञानदेव ठरतात.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT