माउलींची ग्रंथरुपी
ज्ञानसंजीवनी
श्रीज्ञानेश्वर महाराजांनी जगात आदर्श अशी शास्त्र-संतमान्य मानवीजीवने प्रगट व्हावीत यासाठी पंच ग्रंथरत्नांची भेट मराठी सारस्वताला दिली. त्यांचा प्रत्येक ग्रंथ हा असामान्य व्यक्तिमत्व निर्माण करण्यामध्ये समर्थ आहे. श्री ज्ञानदेवांचा ‘हरिपाठ’ हा आकाराने इवलासा; पण अर्थदृष्ट्या त्रिविक्रमाचे रूप धारण करणारा ग्रंथ वारकरी संप्रदायाचा प्राण आहे.
- प्रा. डॉ. श्याम नेरकर, परळी वैजनाथ
दया निधी असलेले श्री ज्ञानेश्वर महाराज हे जसे ज्ञानराज महाराज आहेत तसेच ते देशिकराजही आहेत. संस्कृताच्या गाठोड्यात असलेले वेदोपनिषद - शास्त्र-भगवद्गीतनेमध्ये सांगितलेले मोक्षदायक आत्मज्ञान-तत्त्वज्ञान त्यांनी वारकरी संप्रदायाच्या इतिहासात सर्वप्रथम महाराष्ट्र बोलीत अर्थात् देशीभाषेत प्रगट केले.
संस्कृताची गाठी उघडोनि ज्ञानदृष्टी ।
केलीसे मराठी गीतादेवी ॥ (संत नामदेव म.)
महाराष्ट्रदेशसंबंधी जी देशीभाषा -बोली- मराठी. त्या मराठी भाषेत हे चिंतन प्रतिपादन केले. यासोबतच देशिक म्हणजे संत-गुरू-यथार्थ उपदेष्टा साधू. संतकुळीचा राजा असलेल्या या महात्म्याने दैशिक भाषेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी -ज्ञानदेवी- हा ग्रंथ समाजाला दिला म्हणूनही ते देशिकराज- दैशिकराज आहेत.
या विषयी शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणतात,
देवाधिदेव भक्तांप्रति वरदे ।
देता वर ब्रह्मांडी ब्रह्मानंद व कोंदे ।
देशिकराज दयानिधी जो अलंकापुरी नांदे ।
देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ।।
श्रीज्ञानेश्वर महाराजांनी जगात आदर्श अशी शास्त्र- संतमान्य मानवीजीवने प्रगट व्हावीत यासाठी पंच ग्रंथरत्नांची भेट मराठी सारस्वताला दिली. त्यांचा प्रत्येक ग्रंथ हा असामान्य व्यक्तिमत्व निर्माण करण्यामध्ये समर्थ आहे.
हरिपाठ ः श्री ज्ञानदेवांचा ‘हरिपाठ’ हा आकाराने इवलासा; पण अर्थदृष्ट्या त्रिविक्रमाचे रूप धारण करणारा ग्रंथ वारकरी संप्रदायाचा प्राण आहे.
भावार्थदीपिका ः भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे आदर्श श्रोतृ संवाद असून यात भगवान श्रीकृष्णांचे गीता प्रतिपादित मनोगत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थरूपाने प्रतिपादन केले.
अमृतानुभव ः माउलींनी त्यांचे हृद्गत- त्यांचा सु-असंवेद्य- स्वयंप्रकाशरूप असलेला जो स्वानुभवगम्य बोध आहे, त्याचे विवरण करणारा आदर्श आत्मसंवादरूप अमृतानुभव नावाचा ग्रंथ ही जगासाठी प्रतिपादन केला.
अभंग संहिता ः वारकऱ्याच्या भक्तीला उधाण यावे. पांडुरंगाचे वैभव त्याची संतप्रियता त्याची भक्तवत्सलता सांगून त्याच्या सगुण निर्गुण उभय सौंदर्याचं वर्णन करून वेदांत सिद्ध महापुरुषांनाही पांडुरंगाच्या सगुण भक्तीचा वेड लागावे भजनानंदात वारकऱ्यांनी डुंबून जावं. टाळमृदंगाच्या साह्याने भजनात दंग व्हावे व त्या सगुण निर्गुण उभय स्वरूप असलेल्या पांडुरंगास नृत्य करावयास प्रवृत्त करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्फुट अभंग संहिता लिहून वारकऱ्यांच्या हाती दिली. हा ग्रंथ म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांचा वारकरी भक्त संवादरूप अभंग गाथा होय.
श्री चांगदेव पासष्टी ः श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या प्राणप्रिय सख्यास योगसाधना करत करत योगसिद्धी प्राप्त करणाऱ्या सख्यास, मित्रास त्याच्या कल्याणासाठी पत्राचे उत्तर देण्याच्या निमित्ताने गुर्वाज्ञेने लिहिलेला जो ग्रंथ आहे, तो म्हणजे फक्त ६५ ओव्यांचा असलेला आदर्श मित्रसंवादरूप ‘श्री चांगदेव पासष्टी’ ग्रंथ होय. या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वादात्मक मंगलाचरण केले आहे. श्री चांगदेव महाराज श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी येण्यासाठी म्हणून पत्र लिहिण्यास प्रवृत्त होतात; पण पत्र लिहीत असताना मायना काय लिहावा हे न सुचल्यामुळे कोऱ्या कागदावर काहीही न लिहिता कोराच कागदच श्री ज्ञानेश्वर महाराजांना पत्र म्हणून पाठवतात.
चिरंजीव म्हणो तरी विश्वात्मक ।
तीर्थरूप तरी बाळदशा अंगी ॥
म्हणती चांगदेव काय रे लिहावे?।
मूळ न संभवे पत्रिकेचे ॥ (संत निळोबा महाराज)
श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांनी पाठविलेल्या अक्षरविहीन कोऱ्या पत्रातील भावार्थ जाणला. चांगदेवांनी ज्ञानदेवांना लिहिलेल्या पत्रामध्ये अक्षरांचं मौन होते; पण त्या अक्षराच्या मौनातील भावार्थ श्रीनिवृत्तीनाथ ज्ञानदेव आदी भावंडांनी जाणला. त्यातूनच निवृत्तिनाथांच्या सांगण्याप्रमाणे ज्ञानदेवा, हा नावाप्रमाणेच चांगला आहे. अत्यंत शुद्ध आहे, असे उद्गार काढले. वेदांताच्या भाषेत तत्वमसि महावाक्यांतील त्याच्या जीववाचक त्वम् पदाची शुद्धी पूर्ण झालेली आहे. आता केवळ तत् पद शुद्धीचाच विचार त्याच्या उद्धारासाठी सांगणे क्रमप्राप्त आहे; म्हणून ज्ञानदेवा तुम्ही या अतीव शुद्ध - साधन चतुष्ट्यसंपत्तीने संपन्न मोक्षाधिकारी चांगदेवास आत्मज्ञान सांगा.
पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीच्या चंद्राच्या ठिकाणी जो किंचितसा उणेपणा असतो, तेवढाच उणेपणा चांगदेवांच्या ठिकाणी होता. तेवढाच उणेपणा दूर करण्यासाठी जे चिंतन जो उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना सांगितला. त्या उपदेशात्मक ग्रंथाचे नाव आहे चांगदेव पासष्टी. ज्याप्रमाणे श्री चांगदेवांनी श्री ज्ञानदेवांना पाठविलेल्या पत्रामध्ये अक्षरांचे मौन होते त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी पाठविलेल्या उत्तरात मौनाची अक्षरे होती. ज्या चैतन्याविषयी-आत्मस्वरूपाविषयी वेदालाही काहीही बोलता येत नाही. जिथे शब्द मौनावतात. अशा मौन स्वरूप असलेल्या चैतन्याचं-आत्मस्वरूपाचं प्रतिपादन शब्दद्वारा-अक्षरद्वारा करून ६५ ओव्यांचा मौनालाही अक्षररूपता प्रदान करणारा जो ग्रंथ आशीर्वाद रूपाने चांगदेवाला दिला, तो ग्रंथ म्हणजे चांगदेव पासष्टी आहे. यात गंमत अशी की उपदेश करणारा श्री गुरु हा फक्त चौदा-सोळा वर्षांचा महाज्ञानी आहे. योग्यांची माउली आहे. युक्तयोगी आहे आणि ज्याला उपदेश केला आहे ते चौदाशे वर्ष योगसाधना करून त्याचा शेवट गाठलेले वयोवृद्ध; पण ज्ञानदेवांच्या दृष्टीने अध्यात्मज्ञानदृष्ट्या अगदीच बाल असलेले श्री चांगदेव आहेत. हा एक आदर्श गुरू-शिष्य संवादही आहे. यात श्रीज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्याच ओवीत चांगदेवांना आशीर्वाद देऊन त्याच्या कल्याणाची व्यवस्था करून ठेवली आहे.
स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनी जगदाभासु ।
दावी मग ग्रासु । प्रगटला करी ।।
अर्थात् हे चांगदेवा, तुझे कल्याण असो. जो परमात्मा आपण स्वतः विशेषरुपाने लपून जगताचा आभास दाखवितो, मग तत्त्वज्ञानानंतर तो विशेष रूपाने प्रगट झाला असता जगदाभासाचा ग्रास करून टाकतो. अर्थात् जगदाभास बाधित होतो. नाहीसा होतो. ज्याप्रमाणे मंद अंधकारात दोरीच्या अज्ञानाने सर्प दिसतो; पण दोरीचे विशेष ज्ञान झाले की सर्पाची प्रतीती ही नाहीशी होते. त्याप्रमाणे हे चांगदेवा, आत्मस्वरुपाच्या अज्ञानाने जग दिसण्याचा भ्रम होतो व आत्मस्वरुपाच्या ज्ञानाने जगताचा भ्रम नाहीसा होतो. अशा अनेक युक्ती- प्रयुक्ती-दृष्टांत देऊन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाच्या निमित्ताने सर्व समाजाला सर्वत्र असलेल्या देवाची - चैतन्य पाहण्याची नजर देण्याचे महनीय कार्य या चांगदेव पासष्टीच्या निमित्ताने केले आहे.
हे चांगदेवा तू त्या वटेश्वरचा पुत्र असून
तया पुत्र तू वटेशाचा । रवा जैसा कापुराचा ।
चांगया मज, तुज आपणयाचा बोल ऐके ।।
असे सामवेदाच्या तत्वमसि या महावाक्याचे विवरण श्री ज्ञानदेवांनी या चांगदेव पासष्टीच्या द्वारे केले आहे. या पत्रात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना सखा हे संबोधन वापरले आहे. ते म्हणतात,
सख्या तुझेनि उद्देशे । भेटावया जीव उल्हासे ।
परि सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे॥
हे चांगदेवा, या पासष्टीचा उपदेश करून तुझ्या ठिकाणी अद्वैतबोधाची जी घडी आत्ताच मी बसवली आहे. ती घडी माझ्या तुझ्या भेटीने तुझ्या दृष्टीने कदाचित विस्कटेल की काय? अशी मला भीती वाटते अशी चांगदेवाच्या कल्याणाची तीव्र तळमळ चांगदेव पासष्टी या नावाचा ग्रंथात स्पष्ट पाहायला मिळते. चांगदेवांसारख्या थोर योग्याची माता- असलेल्या ज्ञानाईचे माउलीत्व, तिची अपत्यवत्सलता दर्शित होते. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या आपल्या सख्यारूपी पुत्रास प्राणप्रिय-सख्यास उपदेश करून - मातृत्व स्वीकारून चांगदेवाला आत्मबोधवर आरूढ केले. एवढे मोठे कार्य करूनही चांगदेवाचे गुरुत्व श्रीज्ञानेश्वर महाराजांनी छोट्याशा मुक्ताईकडे दिले. चांगदेवाचेही उद्गार असेच आहेत.
चांगदेव म्हणे आजीची जन्मलो ।
गुरुपुत्र झालो मुक्ताईचा ।।
अशी ही योग्याची - साधकाची माता सध्या पांडुरंगाला भेटण्यासाठी वैष्णवांच्या मांदियाळी सोबत भजनानंदात पंढरीक्षेत्राकडे मार्गस्थ आहे. आम्हालाही त्यांनी सांभाळून घ्यावे. आमच्या ही नरदेहाची सार्थक करावे एवढी विनंती.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.