सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २६ ः हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क आणि परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘मेट्रोझिप’ ही खासगी बससेवा सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. कोविड काळात बंद झालेली ही सेवा सप्टेंबरपासून पुन्हा सुरु होणार असल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.
हिंजवडी आयटी पार्कमुळे पुण्याची जागतिक पातळीवर ओळख झाली आहे. येथे इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा अशा मोठ्या कंपन्या आहेत. तेथे काम करणाऱ्या नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागतो. वाहनचालकांबरोबरच तेथून जाणारे नागरिकही त्यामुळे त्रस्त झाले आहेत. येथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकांना खासगी वाहने बाहेर काढावी लागते आणि कोंडीला सामोरे जाणे भाग पडते.
यावर उपाय म्हणून २०१३ मध्ये या तीन संस्थांच्या प्रयत्नांतून ‘मेट्रोझिप’ ही बससेवा सुरु करण्यात आली होती. ही सेवा हिंजवडी परिसरातील हजारो कर्मचाऱ्यांसाठी वरदान ठरली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ४४ मार्गांवर १०० पेक्षा जास्त बस दिवसाला तीन सत्रांमध्ये सहा हजाररपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सेवा देत होत्या. त्यामुळे खासगी वाहनांचा वापरही कमी झाला होता. तेव्हा वाहतूक कोंडीची तीव्रता आता इतकी नव्हती. कोरोना काळात ही सेवा बंद झाली. त्यानंतर ‘वर्क फ्रॉम होम’चे प्रमाण वाढल्याने ही सेवा पुन्हा सुरू होऊ शकली नव्हती. आता अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ बंद केले आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नियमित उपस्थितीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या पुन्हा वाढली असल्याने कोंडीही वाढली आहे.
त्यातच मेट्रोची कामे सुरू असल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे. कोंडीमुळे अनेक कर्मचारी कंपनीत वेळेवर पोहोचू शकत नाही. यामुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे ‘मेट्रोझिप’ बससेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
------
‘मेट्रोझिप’ बससेवा सुरु करण्यासाठी कोकोराइड्स या संस्थेशी करार केला आहे. ही सेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ‘आरटीओ’ आणि ‘एमआयडीसी’ यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाल्यास ही सेवा लवकरच सुरु होईल. अधिकाधिक कंपन्या आणि कर्मचाऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतल्यास रस्त्यावरील वाहनांची संख्या, कोंडी आणि पर्यायाने प्रदूषणही कमी होईल.
- कर्नल शंकर सालकर, व्यवस्थापकीय संचालक, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.