पिंपरी, ता. २७ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) होणाऱ्या ११ मलनिस्सारण योजनांना गती मिळणार आहे. याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ‘एसटीपी’ प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. त्याद्वारे नदी आणि नाल्यात जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल.
घराघरांतील सांडपाणी नदी, नाल्यांत मिसळल्याने प्रदूषणात भर पडते आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’ विविध उपाययोजना आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ११ ठिकाणी मलनिस्सारण योजना कार्यान्वित होतील. केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत मलनिःसारण योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ३०० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. या योजनांअंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्राद्वारे (एसटीपी) पुर्नप्रक्रिया करण्यात येईल.
‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील गावांमध्ये ११ ठिकाणी मल्लनिस्सारणाची कामे होणार आहेत. यामध्ये भूगाव, भुकूम, पिरंगुट, लवळे, हिंजवडी, माण, घोटवडे, चाकण-मेदनकरवाडी, शिक्रापूर-सणसवाडी, मारुंजी, केसनंद व चाकण परिसरातील इतर गावांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया होऊन त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर झाला आहे. आता निविदा प्रक्रिया सुरू होईल.
भूकूममध्ये ‘एसटीपी’चे काम सुरू आहे. काही ठिकाणी जे ‘एसटीपी’ प्रकल्प बंद आहेत, तेच सुरू करण्याचा ‘पीएमआरडीए’ प्रशासनाचा विचार आहे. निविदा प्रक्रिया राबवून हे प्रकल्प त्वरित उभारले जातील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
---
नदी प्रदूषण रोखणे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. त्याद्वारे नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ प्रयत्नशील आहे. त्यानुसार आमच्या हद्दीत ११ ठिकाणी होणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना गती देण्यात येईल. याची निविदा प्रक्रिया राबविणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, ‘पीएमआरडीए’
-----