पिंपरी, ता. २७ : सोमाटणे टोल नाका येथे मागील महिन्यात पोलिस पथकावर गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या घरफोडीतील सराईत गुन्हेगाराकडून तपासादरम्यान बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हिंजवडीत चोरी केलेली मोटार घेऊन सोमाटणे टोल नाक्यावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी २७ नोव्हेंबर सोमाटणे टोल नाका येथे पहाटे सापळा रचून संशयित मोटारीला अडवले. दरम्यान, मोटारीत मागे बसलेल्या एका आरोपीने त्याच्याकडील पिस्तुलातून पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पोलिस हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीच्या हातातील पिस्तूल हिसकावले. यावेळी झालेल्या झटापटीत पिस्तुलातून गोळी सुटली आणि गोळी मोटारीच्या छताला लागून आरपार गेली. दरम्यान, पथकातील इतर पोलिसांनी तातडीने झडप घालून मोटारीतील सनीसिंग पापासिंग दुधानी, जलसिंग राजपुतसिंग दुधानी (दोघेही रा. रामटेकडी, हडपसर) आणि मनीष बाबुलाल कुशवाह (रा. मध्यप्रदेश) या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
या आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून चिंचवड, रावेत, हिंजवडी, बाणेर, कोथरूड, वाकड, भोसरी एमआयडीसी, पिंपरी, निगडी या पोलिस ठाण्यात दाखल असलेले घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून २९ लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
तसेच त्यांच्याकडून सोन्याचे दागिने विकत घेणारे किरपानसिंग शितलसिंग दुधानी (रा. भैरवनाथ नगर, कुसगाव, मावळ), शांताराम ऊर्फ संतोष गुरप्पा कांबळे (दोघेही रा. भैरवनाथनगर, कुसगाव, मावळ), अक्षय राजू चनाल (रा. खंडाळा, मावळ) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरोपी सनीसिंग याच्यावर विविध पोलिस ७१ गंभीर गुन्हे दाखल असून, जलसिंग याच्यावर ५६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.