पिंपरी, ता. ५ : पिंपरी चिंचवडच्या महापौरपदाची निवड प्रक्रिया शुक्रवारी (ता. ६) होणार आहे. त्यासाठी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन केले आहे. मात्र, महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने ते बिनविरोध ठरले आहे. त्यांच्या नावावर विशेष सभेच्या माध्यमातून शिक्कामोर्तब होणार आहे.
महापालिकेत फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडून आलेल्या सभासदांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. कोरोना प्रतिबंधक नियमावली, इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा आणि राज्यातील बदलती राजकीय समीकरणे आदी कारणांमुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी निवडणूक झाली आहे. त्यात ८४ जागांवर विजय मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवाय, भाजप पुरस्कृत एका अपक्षानेही विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ आणि शिवसेनेला सहा जागा मिळाल्या आहेत. आता शुक्रवारी ( महापौर आणि उपमहापौरपदाची निवड होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. महापौरपदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल आहे. त्यावर निवड प्रक्रिया होऊन केवळ विजयी घोषणा बाकी आहे.
उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी लढणार, की माघार?
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२८ पैकी ३७ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस द्वितीय क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राज्य व केंद्र सरकारमध्ये मित्रपक्ष असलेले भाजप व राष्ट्रवादीने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढली. यात सहा जागा मिळवलेल्या शिवसेनेचाही समावेश आहे. आता राष्ट्रवादीने महापौरांऐवजी उपमहापौरपदासाठी उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांनी भाजपच्या शर्मिला बाबर यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. मात्र, ही निवडणूक लढवायची की ऐनवेळी माघार घ्यायची? याबाबत राष्ट्रवादीने गुरुवारी (ता. ५) सायंकाळपर्यंत भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित गटनेते तथा विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले भाऊसाहेब भोईर यांनी सत्तेत सहभागी होणार नसल्याचे सुतोवाच दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असेल, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ते उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेणार नाहीत, असे दिसते.
उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक लढवायची की माघार घ्यायची, याबाबत निर्णय झालेला नाही. त्यासाठी गुरुवारी रात्री उशिरा बैठक होईल. निवड प्रक्रियेदरम्यान आमची भूमिका जाहीर करू.
- योगेश बहल, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पिंपरी चिंचवड
सभागृह चार वर्षांनी सज्ज
महापालिका सभागृहातील यापूर्वीची शेवटची सभा २० जानेवारी २०२२ रोजी झाली आहे. १४ मार्च २०२२ पासून प्रशासक म्हणून आयुक्त कारभार पाहत आहेत. आता निवडणूक झाल्याने शुक्रवारी (ता. ६) महापौर व उपमहापौर निवड होणार आहे. त्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभेचे ठिकाणी अर्थात यशवंतराव चव्हाण सभागृह सज्ज झाले आहे. १२८ नगरसदस्यांसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आसनव्यवस्था सभागृहात आहे. अर्धवर्तुळाकार सभागृहात पीठासीन अधिकारी, महापालिका आयुक्त व नगरसचिवांसाठी आसनव्यवस्था आहे. पीठासीन अधिकाऱ्यांच्या उजव्या बाजूस नगरसचिव आणि डाव्या बाजूस आयुक्तांचे आसन असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.