पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ७ ः गेल्या सहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्याबाबत जलद उपाययोजना करून दररोज पाणीपुरवठा करण्याचे आव्हान सत्ताधारी भारतीय जनता पक्षासमोर आहे. भाजपच्याच सत्ताकाळात दिवसाआड पाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर प्रशासकीय काळातील चार वर्ष उलटली आहेत. आता पुन्हा भाजपची सत्ता आली असून पाणीपुरवठा ते किती दिवसांत सुरळीत करतात की केवळ आश्वासनांची पाने जनतेला तोंडाला पुसतात हे आगामी काळात कळणारच आहे.
अपुरा, अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. शिवाय, पाणी गळती व चोरीचे प्रमाण जवळपास ४० टक्के होते. त्यामुळे सर्वांना समान, नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळण्यासाठी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबरपासून २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या त्यांच्याकडेच महापालिकेचा प्रभारी कारभार आहे. तेव्हाही महापालिकेत भाजपचीच सत्ता होती आणि आताही भाजपच्या हातात कारभार आला आहे. दिवसाआडचा निर्णय होण्यापूर्वीपासून आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून अनुक्रमे १०० व १६७ दशलक्ष पाणी आणण्यासाठी जॅकवेल, पंपिंग स्टेशन, जलवाहिन्या टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे यांची कामे सुरू होता. दिवसाआड पाणीपुरवठा निर्णयानंतरचे साधारण दीड वर्ष आणि प्रशासकीय काळाची चार वर्षे अशी साडेपाच वर्षे उलटली तरी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. सद्यःस्थितीत पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा होत आहे. त्याचे दिवसाआड वितरण केले जात आहे. यात सुधारणा होऊन भाजपने निवडणूक काळात दिलेले दररोज पाणीपुरवठ्याचे आश्वासन पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
असा होतोय पाणीपुरवठा
- पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग केला जातो. नदीवरील रावेत बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करून वाहिन्यांद्वारे निगडी प्राधिकरण सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. तिथे प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचे शहरात वितरण केले जात आहे.
- आंद्रा धरणातून केलेला विसर्ग इंद्रायणी नदीद्वारे शहरापर्यंत पोहोचतो. नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचे शहरात वितरण केले जात आहे.
सद्यःस्थितीत मिळणारे पाणी
(एमएलडी अर्थात दशलक्ष लिटरमध्ये)
धरण / पाणी
पवना / ५१०
आंद्रा / १००
एमआयडीसी / ३०
(एमआयडीसी पवना धरणातील पाणी रावेत बंधाऱ्यातून उचलते, महापालिका त्यांच्याकडून ३० एमएलडी पाणी दररोज घेते)
भविष्यातील नियोजन
- पवना धरणातील गाळ काढून साठा वाढवणे
- पवना धरणातून जलवाहिनीद्वारे थेट पाणी आणणे
- भामा-आसखेड धरणातून मंजूर १६७ एमएलडी पाणी जलवाहिनीद्वारे आणणे
- आंद्रा धरणातील पाणी नदीऐवजी जलवाहिनीद्वारे आणणे
- मुळशी धरणातून पाणी मिळवणे
- २४ बाय सात योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करणे
सद्यःस्थितीतील तयारी
- निगडी प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमतावाढ
- चिखली जलशुद्धीकरण केंद्राची ३०० एमएलडी पाणी क्षमता
- सध्याच्या जलवाहिन्या व नळजोड बदलून गळती व चोरी रोखण्यासाठी उपाययोजना
- आंद्रा व भामा-आसखेड धरणांतून पाणीपुरवठ्यासाठी
जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू
- निगडी जलशुद्धीकरण केंद्रापासून दापोडीपर्यंत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही हमी
महापालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘पिंपरी चिंचवडसाठी हमीपत्र’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘संकल्प सात, पुन्हा सुरवात असे जाहीरनाम्याचे घोषवाक्य होते. त्यातील एक संकल्प ‘दररोज पाणीपुरवठा’ असाही आहे. आता निवडणूक होऊन राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. त्यांचे ३७ नगरसेवक असून ते आपल्या संकल्पाला जागून दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी सभागृहात काय भूमिका घेतात हेही दिसणार आहे.
शहरातील पाणीपुरवठा नियमित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासह आरोग्यविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यास प्राधान्य देणार आहे.
- रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड
--
फोटो
93615
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.