पिंपरी, ता. ३ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधील घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या तीन उमेदवारांना व शिवसेनेच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म उशिरा मिळाले. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची त्यांची संधी हुकली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात ‘अंतर्गत’ आघाडी झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे आणि पुतण्या नीलेश बारणे यांची लढत थेट भाजपबरोबर होणार असल्याने सोईस्कर झाली आहे.
थेरगाव प्रभागातील भाजपच्या तीन उमेदवारांचे अर्ज एबी फॉर्म उशिरा आल्याने बाद झाले. ‘ब’ मध्ये करिष्मा सनी बारणे, ‘क’ मध्ये शालिनी कांतिलाल गुजर आणि ‘ड’ मध्ये गणेश दत्तोबा गुजर हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. तर; शिवसेनेच्या पुरस्कृत ‘ड’ मध्ये रूपाली गुजर, ‘ड’ मध्येच शिवसेनेकडे इच्छुक असलेल्या निशा अनिकेत प्रभू आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे पुरस्कृत झाल्या आहेत.
भाजपमधून कोणी कोणाच्या विरोधात उभे राहायचे, यावर अंतर्गत निर्णयास विलंब झाल्याने तिघांचे एबी फॉर्म वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा होऊ शकले नाहीत. सध्या त्यांना भाजपपुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविता यावी यासाठी हालचाली सुरू आहेत. ‘अ’ मधून माजी उपमहापौर झामाबाई बारणे पुत्र सिद्धेश्वर बारणे हे भाजपचे उमेदवार असून त्यांची थेट विश्वजीत बारणे यांच्याशी लढत होणार आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीने चार पैकी तीन अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यापैकी संतोष बारणे आणि मंगेश बारणे यांनी माघार घेतल्याने ‘क’ मध्ये राष्ट्रवादीकडून माया बारणे व ‘ब’ मधून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख ॲड. वर्षा भोसले यांना राष्ट्रवादीमधून ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. तर; ‘ड’ मधून सचिन भोसले यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. या पार्श्वभूमीवर ‘अंतर्गत’ आघाडी स्पष्ट होते. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक २३ मधील शिवसेनेचे उमेदवार प्रशांत सपकाळ यांनीही माघार घेतल्याने ही रणनीती जाणीवपूर्वक आखण्यात आल्याची चर्चा आहे.
एकतर्फी लढत !
या प्रभागात विश्वजीत बारणे आणि नीलेश बारणे हे शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत असल्याने त्यांच्या विजय सुकर करण्यासाठीच या घडामोडी घडवून आणल्याचा आरोप होत आहे. एबी फॉर्म उशिरा मिळणे, काही पक्षांनी उमेदवारच न देणे आणि अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेणे, या सर्व बाबी चर्चेच्या ठरल्या जात आहेत. विश्वजीत बारणे यांच्यासमोर भाजपचे सिद्धेश्वर बारणे असले तरी नीलेश बारणे यांच्या विरोधात प्रमुख पक्षाचा एकही उमेदवार उरलेला नाही. परिणामी या प्रभागातील लढती एकतर्फी होण्याची शक्यता आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.