पिंपरी, ता. १५ ः पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी शहरात शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात वाजल्यापासूनच विविध प्रभागांतील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावल्याने यंदाच्या निवडणुकीत चुरस वाढल्याचे चित्र दिसून आले.
सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सीलबंद करण्यात आली असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता उद्या निकाल जाहीर होणार असल्याने कोण निवडून येणार आणि कोण पराभूत होणार याची उमेदवारांसह नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
या निवडणुकीत शहरातील भारतीय जनता पक्षाच्या चार आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांनी आपापल्या भागांतील प्रभागांमध्ये ताकद लावून उमेदवारांचा प्रचार केला. त्यामुळे ही निवडणूक केवळ नगरसेवकांची नसून स्थानिक नेत्यांच्या राजकीय भवितव्याचीही चाचणी आहे. विशेषतः भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरली आहे. उमेदवारांना तयारीसाठी अवघे तीस दिवस मिळाले. त्यात प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारादरम्यान जाहीर सभेतून सेटिंग चालणार नाही असा स्पष्ट इशारा पक्षातील पॅनेल प्रमुखांना दिला होता. या वक्तव्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रमुख नेत्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली. भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे, चिंचवडमध्ये आमदार शंकर जगताप, पिंपरीत आमदार उमा खापरे तसेच आमदार अमित गोरखे यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. घरोघरी भेटी, सभा, पदयात्रा आणि रोड शो यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहरात जाहीर सभा आणि भव्य रोड शो घेतले. त्यांच्या उपस्थितीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. विकास, स्थैर्य आणि सक्षम नेतृत्व या मुद्द्यांवरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होता. , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष जाऊन प्रचाराची धुरा सांभाळली. प्रचार सभा, पदयात्रा, दुचाकी रॅली आणि रोड शो यांच्या माध्यमातून त्यांनी वातावरण निर्मिती केली.
शिवसेना नेते व खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सभेत संवाद साधत भाषण केले. या सर्व घडामोडींमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने गेला, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
----------
महापौर कुणाचा ?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक निकालाकडे शहराचे लक्ष लागले असून महापौरपद कुणाच्या वाट्याला येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचीच सत्ता येणार असून महापौर आमच्याच पक्षाचा होणार, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. संघटनात्मक ताकद आणि नेत्यांची सक्रियता लक्षात घेता भाजपला आत्मविश्वास आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा परिवर्तन अटळ असल्याची भूमिका घेतली असून सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजीचा फायदा आपल्याला होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर, शिवसेना नेते उदय सामंत यांनी महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात महापौर कुणाचा होणार, कोणत्या पक्षाला बहुमत मिळते किंवा त्रिशंकू स्थितीत घटक पक्ष व अपक्ष नगरसेवक कोणाला पाठिंबा देतात, यावर हे ठरणार आहे.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.