पिंपरी, ता. १७ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत काही प्रभागांमध्ये अत्यंत अनपेक्षित निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात ते चर्चेचे विषय ठरले आहेत. प्रभाग क्रमांक ८, १६, २०, २१ आणि ३२ मध्ये अनेक दिग्गजांचा नवख्या उमेदवारांनी पराभव करत इतिहास रचला. प्रस्थापित आणि प्रभावशाली उमेदवारांना मतदारांनी नाकारत नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे चित्र या प्रभागांत आहे. या उलथापालथीमुळे अनेक पक्षांची राजकीय गणिते कोलमडली असून दिवसभर या निकालांची चर्चा रंगली.
इंद्रायणीनगर-बालाजीनगर प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या सीमा सावळे यांना भाजपचे डॉ. सुहास कांबळे यांनी पराभवाचा धक्का दिला. सावळे या स्थायी समिती सभापती राहिलेल्या आहेत. याच प्रभागातून भाजपचेच माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांना राष्ट्रवादीच्या तुषार शहाणे यांनी पराभूत करत ‘कात्रजचा घाट’ दाखविला. तुषार सहाणे यांचा गेल्या महापालिका निवडणुकीत निसटता पराभव झाला होता.
किवळे-रावेत-मामुर्डी प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादीचे मातब्बर नेते मोरेश्वर भोंडवे यांना शिंदेसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस यांनी धूळ चारली. महेशनगर-वल्लभनगर प्रभाग क्रमांक २० मध्येही लक्षणीय उलथापालथ पाहायला मिळाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुलक्षणा-धर यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र ननावरे विजयी झाले. याच प्रभागात राष्ट्रवादीच्या नवख्या वर्षा जगताप यांनी भाजपच्या महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांच्यावर विजय मिळवत त्यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखली.
सर्वांत मोठा ‘जायंट किलर’ निकाल पिंपरी गाव-पिंपरी कॅम्प-मिलिंदनगर प्रभाग २१ मध्ये पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या प्रियंका कुदळे यांनी भाजपच्या व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे यांचा पराभव केला. या प्रभागातील यशात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले संदीप वाघेरे यांचा व माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा मोठा वाटा आहे. तर; सांगवी-नवी सांगवी प्रभाग ३२ मध्ये दोन माजी स्थायी समिती अध्यक्षांमध्ये थेट लढत झाली. यात भाजपचे प्रशांत शितोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल शितोळे यांच्यावर मात केली. या प्रभागातील धक्कादायक निकालाबाबत दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. या अनपेक्षित निकालांनी शहराच्या राजकारणात नवे संकेत दिले असून आगामी काळात पक्षांची रणनीती आणि नेतृत्वबदलावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.