पवनानगर, ता. १५ : शिवणेतील संत तुकाराम विद्यालयात दोन वर्गखोल्या आणि विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचे उद्घाटन करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून मॅकवर्ड्स कंपनीच्या सीएसआर फंडातून हा उपक्रम राबवण्यात आला.
याप्रसंगी कार्यवाह चंद्रकांत शेटे, विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष संदीप काकडे, युवराज काकडे, श्रीशैल मेंथे, दीपक शहा, विलास जाधव, भालचंद्र लेले, विकास उभे, माजी सभापती एकनाथ टिळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत शिंदे आदींसह कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले की, शिक्षण हा विकासाचा पाया आहे, हे लक्षात घेऊन मॅकवर्ड्सने शैक्षणिक सुविधांसाठी मदतीचा निर्णय घेतला आहे. यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष कमलेश कारले म्हणाले की, या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी भविष्य घडवण्याचे प्रतीक आहे. हा उपक्रम फोसेकोच्या शैक्षणिक विकासातला मॅकवर्ड्सच्या सीएसआर मोहिमेचा एक भाग असून, याद्वारे प्रवेश आणि गुणवत्तेवर भर देण्यात येणार असल्याचे विशाल नार्वेकर यांनी सांगितले. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र शेळके यांनी तर सूत्रसंचालन रामदास टिळे यांनी केले. संदीप काकडे यांनी आभार मानले.